आई, शिक्षक आणि शाळेप्रती कृतज्ञतेचा अनोखा सन्मान : माजी विद्यार्थ्याकडून १०० विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर वाटप.
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित स्व. आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थी राहुल मधुकर कुंभार यांनी आपल्या आई, शिक्षक आणि शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत १०० विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तरांचे वाटप केले.

राहुल कुंभार हे या शाळेचे माजी विद्यार्थी असून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा मिळाव्यात तसेच सर्व विद्यार्थ्यांमध्ये समानतेची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम राबवला.
यावेळी राहुल कुंभार यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “आई ही आयुष्याची पहिली गुरू असते आणि त्यानंतर शाळेतील शिक्षक मुलांच्या आयुष्यात मूल्ये, संस्कार आणि शिस्त रुजवत असतात. आज मी व्यवसायात यशस्वी झालो असलो तरी त्यामागे आई आणि शिक्षकांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आई वजाबाई यांच्या नावाने विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.”
कार्यक्रमात मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांनी दाते राहुल मधुकर कुंभार यांचा तर संस्थाचालक पियुषा पाटील यांनी त्यांच्या आई वजाबाई कुंभार यांचा सत्कार केला.
प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ नागरिक कैलास कुंभार, लोटन बाबुराव कुंभार, लोटन रघुनाथ कुंभार, धुडकू कुंभार, समाधान कुंभार, पंकज पाटील आणि शत्रुघ्न पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले. यावेळी अशोक सूर्यवंशी, प्रभूदास पाटील, राजेंद्र पाटील, सुषमा सोनवणे, शीतल चव्हाण, सीमा मोरे, राहुल पाटील, सीमा पाटील यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपशिक्षक संजय पाटील यांनी सांगितले की, “मूल्ये आणि संस्कारांचा ऱ्हास होत असतानाही ग्रामीण भागातील राहुलसारख्या विद्यार्थ्यांच्या मनात शाळा, शिक्षक आणि आईप्रती कृतज्ञता आणि दातृत्व टिकून आहे, ही अभिमानाची बाब आहे.”
दरम्यान, शाळेत छत्रपती शाहू महाराज जयंती देखील उत्साहात साजरी करण्यात आली. युवक कल्याण प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात १०० वक्त्यांच्या उपक्रमांतर्गत अनिता संदानशीव यांनी मंगरूळ येथे व्याख्यान देत शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी गीतही सादर केले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला
