अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शहर कार्यकारिणी जाहीर; हाजी मो. रफीक तेली यांच्यावर शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी.
अमळनेर | आबिद शेख

अमळनेर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) ची जम्बो शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून शहराध्यक्ष चेतन राजपूत यांनी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या मंजुरीने ही घोषणा केली आहे.
या नव्या कार्यकारिणीत अमळनेर शहरातील विविध प्रभागांतील कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला असून समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. शहरातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, नवीन कार्यकर्त्यांना संधी देणे आणि पक्षाचा जनाधार वाढविणे या उद्देशाने ही कार्यकारिणी तयार करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

याच पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष चेतन राजपूत यांनी अमळनेर शहरातील मस्जिद अब्बासिया ट्रस्टचे अध्यक्ष तसेच युवा व्यापारी हाजी मो. रफीक अ. रहेमान तेली यांच्यावर शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.
या नियुक्तीमुळे सामाजिक, धार्मिक आणि व्यापारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना पक्ष संघटनेत स्थान मिळाल्याची चर्चा असून आगामी काळात शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन अधिक सक्षम करण्यासाठी ही कार्यकारिणी पूरक ठरेल, असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
