अमळनेरकरांचा सन्मान नेमका कुठे हरवला? जिवंतपणी हाल… मृत्यूनंतरही विटंबना.

0

आबिद शेख /अमळनेर 

शहराचा विकास केवळ रस्ते, इमारती किंवा घोषणांवर मोजला जात नाही; तर त्या शहरातील प्रशासन नागरिकांच्या जगण्याचा आणि मृत्यूनंतरच्या सन्मानाचाही किती आदर राखते यावर त्याची खरी ओळख ठरते. मात्र अमळनेर शहरात अलीकडे समोर आलेल्या सलग घटनांनी नगरपरिषदेच्या व्यवस्थापन आणि संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
सर्वाधिक धक्कादायक ठरलेली घटना म्हणजे बेवारस मृतदेहाच्या विल्हेवाटीची. शहरात मृतावस्थेत आढळलेल्या एका बेवारस व्यक्तीच्या शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था असणे अपेक्षित असताना, संबंधित मृतदेह कचरा वाहतूक करणाऱ्या घंटागाडीतून नेण्यात आल्याचा प्रकार समोर आला. या घटनेने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, मृत्यूनंतरही माणसाच्या सन्मानाची अशी पायमल्ली होत असल्याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.


नागरिकांच्या मते, ही घटना केवळ व्यवस्थेतील त्रुटी नसून प्रशासन आणि संबंधित यंत्रणेच्या संवेदनशीलतेवर प्रश्न निर्माण करणारी आहे.
यापूर्वीही अमरधाम स्मशानभूमीतील सुविधांबाबत गंभीर आरोप समोर आले होते. प्रभाग क्रमांक ३ च्या नगरसेविका शोभाबाई गढरे तसेच राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष दुर्गेश पाटील (डी.पी.) यांनी स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. सरणासाठी आवश्यक साहित्य अपुरे असल्याने काही वेळा अंत्यसंस्कार पूर्णपणे होत नसल्याचे तसेच व्यवस्थेअभावी नातेवाईकांनाच सर्व व्यवस्था करावी लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली होती.
दरम्यान, शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी केलेल्या पाहणीनंतर जलकुंभांची अनेक वर्षे स्वच्छता न झाल्याचा दावा करण्यात आला. टाक्यांमध्ये साचलेल्या गाळामुळे नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप करण्यात येत असून यामुळे आरोग्याच्या प्रश्नांनाही तोंड फुटले आहे.
या सर्व घटनांकडे एकत्रितपणे पाहिल्यास नागरिकांमध्ये एकच भावना व्यक्त होत आहे — जिवंत असताना स्वच्छ पाणी नाही आणि मृत्यूनंतर सन्मानाचीही हमी नाही.
अमळनेर शहराच्या विकासाच्या घोषणा होत असताना मूलभूत नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि अंत्यसंस्कार व्यवस्थेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
तथापि, या प्रकरणात संबंधित प्रशासनाने अधिकृत भूमिका मांडली असून चौकशीत वेगळे निष्कर्ष समोर आल्यास तेही जनतेसमोर आणले जाणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

गणेश शिंदे, मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद :
“घडलेला प्रकार असंवेदनशील असून संबंधित ठेकेदाराकडून गंभीर निष्काळजीपणा झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. त्याला नोटीस बजावून नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.”
डॉ. परीक्षित बाविस्कर, लोकनियुक्त नगराध्यक्ष, अमळनेर नगरपरिषद :
बेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावताना कचरा संकलन वाहनाचा वापर झाल्याची बाब अत्यंत चुकीची आहे. या प्रकरणात संबंधित ठेकेदाराची कोणतीही गय केली जाणार नाही आणि कठोर कारवाई केली जाईल.”
प्रश्न मात्र कायम…
“अमळनेरकरांनी प्रशासनाकडून फक्त सुविधा मागायच्या की माणुसकीचाही हक्क मागायचा?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed