चोपड्यातील पोक्सो प्रकरणात आरोपीला ५ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल.

0

24 प्राईम न्यूज 26 Jun 2026


— चोपडा शहरातील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नाशी संबंधित पोक्सो प्रकरणात न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत पाच वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच ५ हजार ५०० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
या प्रकरणात आरोपी सलमान खान अख्तर खान (वय २८, रा. हमीद नगर, चोपडा) याच्याविरोधात चोपडा शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३८५/२०२४, स्पेशल केस क्र. ५०/२०२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणात भारतीय न्याय संहिता तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.


फिर्यादीनुसार, घटना १२ ऑगस्ट २०२४ रोजी घडली. फिर्यादी व तिचे पती कामासाठी बाहेर असताना घरात मुलांची देखभाल करण्यासाठी अल्पवयीन मुलगी घरी होती. त्यावेळी आरोपीने घरात प्रवेश करून मुलीसोबत अयोग्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला होता. मुलीच्या प्रतिकारानंतर आणि तिच्या बहिणीने आरडाओरड केल्याने आरोपी तेथून पळून गेल्याचे तपासात समोर आले.
सदर खटल्याची सुनावणी मा. श्रीमती सी. व्ही. पाटील, जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात झाली. अभियोजन पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. के. आर. बागुल व मंगरूळकर यांनी एकूण ७ साक्षीदारांची साक्ष नोंदवली.
या खटल्यात फिर्यादी, पीडित मुलगी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, घरमालक तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी आणि तपासातील पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरले. तपास अधिकारी व पोलिसांनी सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या सुसंगत जबाबांच्या आधारे न्यायालयाने आरोपी दोषी असल्याचे मान्य केले.
न्यायालयाने आरोपीस पोक्सो कायद्याच्या कलम १० अंतर्गत ५ वर्षांची सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, तसेच बीएनएस कलम ३३२(क) अंतर्गत ६ महिन्यांची शिक्षा व ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त साध्या कारावासाची तरतूदही आदेशात नमूद करण्यात आली.
या प्रकरणाच्या तपास आणि खटल्याच्या कामकाजात संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed