शाळा बस चालकांवर पोलिसांची अचानक नजर; ३६ वाहनांची तपासणी, एकही चालक मद्यधुंद नाही.

0

अमळनेर | आबिद शेख 


शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत अमळनेर उपविभागात शाळेच्या बस चालकांची अचानक मद्यपान तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण ३६ शाळा बस चालकांची तपासणी करण्यात आली असून कोणताही चालक मद्यधुंद अवस्थेत आढळून आला नसल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.
आज दिनांक २५ जून २०२६ रोजी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक बाजीराव कोते यांच्या नेतृत्वाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली.

सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत अमळनेर, पारोळा आणि एरंडोल पोलीस स्टेशन हद्दीतील मुख्य चौक तसेच शाळांजवळ तपासणी पथकांनी अचानक कारवाई केली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस चालकांची ब्रेथ अॅनालायझर मशीनद्वारे मद्यपान तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीत ११, पारोळा येथे १३ आणि एरंडोल येथे १२ अशा एकूण ३६ शाळा बसांची तपासणी करण्यात आली. सर्व चालकांची तपासणी केल्यानंतर कोणताही चालक मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आला नाही.
यावेळी पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले की, शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा प्रकारच्या मोहिमा नियमितपणे सुरू राहतील. तसेच सर्व शाळा प्रशासन आणि पालकांनी बस चालकांचे वेळोवेळी वैद्यकीय प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी करून घ्यावी आणि बसमध्ये महिला मदतनीस असणे बंधनकारक असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भविष्यात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed