मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेले ३९ रुग्ण वाहनाद्वारे पनवेल येथे रवाना.

0

 


अमळनेर (प्रतिनिधी): येथील मंगळग्रह सेवा संस्था, मा. ना. श्री. गुलाबरावजी पाटील सोशल फाऊंडेशन (पाळधी), संकल्प सेवा फाऊंडेशन (धनवाडी) आणि आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल (पनवेल) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २१ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


समाजातील गरजू व ज्येष्ठ नागरिकांना दर्जेदार नेत्र आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला.
शिबिरादरम्यान नेत्रतज्ज्ञ डॉ. विजय बामणे, डॉ. गुरुप्रीत सिंग, डॉ. राहुल पाटील, डॉ. भूपेंद्र वाघ तसेच निशा शिंदे व प्राची गायकवाड यांनी नागरिकांची नेत्र तपासणी केली. एकूण ७३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी सखोल वैद्यकीय तपासणीनंतर ३९ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले.
पात्र रुग्णांची आवश्यक कागदपत्रे व वैद्यकीय नोंदी पूर्ण करून संस्थेच्या वतीने सर्व रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली. हे सर्व रुग्ण दुपारी साडेचार वाजता श्री मंगळग्रह मंदिरातून पनवेलकडे रवाना झाले. शस्त्रक्रियेसह पुढील आवश्यक वैद्यकीय सुविधा संबंधित रुग्णालयामार्फत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
यावेळी उपस्थित रुग्णांच्या हस्ते नेत्रतज्ज्ञांचा सत्कार करण्यात आला.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त मंडळ, सेवेकरी तसेच वैद्यकीय पथक यांनी विशेष परिश्रम घेतले. नागरिकांनीही अशा सामाजिक आरोग्य उपक्रमांचे स्वागत करत भविष्यातही अशाच शिबिरांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
समाजातील दुर्बल घटकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी मंगळग्रह सेवा संस्था सातत्याने कार्यरत असून दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी भव्य मोफत मोतीबिंदू शिबिराचे आयोजन केले जाते. भविष्यातही विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येतील, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम व खजिनदार गिरीश कुलकर्णी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed