प्रताप हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर : विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी तसेच योगाचे महत्त्व समजावे या उद्देशाने प्रताप हायस्कूल येथे २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी अमळनेर पतंजली योग समितीच्या योग शिक्षिका ज्योती माळी व भावना महाजन प्रमुख उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती एस. पी. बाविस्कर होत्या.
यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात योगाचे वाढते महत्त्व, तसेच त्याचा शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम याविषयी माहिती दिली. योग शिक्षिका ज्योती माळी व भावना महाजन यांनी विद्यार्थ्यांकडून प्राणायाम, विविध योगासने आणि सूर्यनमस्कार यांचे प्रात्यक्षिक करून घेतले. नियमित योगाभ्यास केल्यास निरोगी व तंदुरुस्त जीवन जगता येते, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रतिनिधी दिनेश पालवे यांनी केले. यावेळी सुहास खांजोडकर, के. जी. कोळी, सचिन अहिरे, एन. आर. पाटील, सागर पवार, जयश्री पाटील व नम्रता दोरकर यांनी सहभाग घेतला. तसेच प्राथमिक विभागातील ज्येष्ठ शिक्षक लक्ष्मण पाटील व विद्या पटेल यांनी आपल्या विद्यार्थ्यांसह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
कार्यक्रमास विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
