उद्यापासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन; पाणीटंचाई, शेतकरी प्रश्न आणि राजकीय घडामोडींवर होणार जोरदार चर्चा.

0

24 प्राईम न्यूज 21 Jun 2026


राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार, दि. २२ जूनपासून सुरू होत असून ते १० जुलैपर्यंत म्हणजेच सुमारे तीन आठवडे चालणार आहे. यंदाचे अधिवेशन अनेक राजकीय आणि जनतेशी निगडित महत्त्वाच्या मुद्द्यांमुळे वादळी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यात कमी झालेला पाऊस, निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, अनेक भागांतील तीव्र पाणीटंचाई, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान तसेच कोकणातील बागायतदारांच्या अडचणी हे मुद्दे विरोधकांकडून आक्रमकपणे मांडले जाणार असल्याची शक्यता आहे.


याशिवाय ‘लाडकी बहीण’ योजनेतून सुमारे ८० लाख महिलांना वगळल्याचा मुद्दाही अधिवेशनात गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माहिती अधिकार कायद्यातील नव्या तरतुदींवरही विरोधकांकडून आक्षेप नोंदवला जाऊ शकतो.
राजकीय पातळीवरही हे अधिवेशन महत्त्वाचे मानले जात आहे. शिवसेना ठाकरे गटातील खासदारांच्या घडामोडी आणि त्यानंतर आमदारांमध्ये फुटीच्या चर्चांमुळे निर्माण झालेल्या वातावरणाचे पडसाद अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे.
विरोधकांकडून सरकारला विविध मुद्द्यांवर घेरण्याची रणनीती आखली जात असून सत्ताधारी पक्षाकडूनही त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाचे पावसाळी अधिवेशन राजकीयदृष्ट्या चांगलेच गाजण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed