ग्रामीण शिक्षणाला चालना; जि.प. शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी स्वखर्चाने भरणार – सरपंच सचिन पाटील.
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर : ग्रामीण भागातील शैक्षणिक विकासाला चालना देण्यासाठी आणि जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी तालुक्यातील अंतुर्ली–रंजाणे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सचिन बाळू पाटील यांनी एक आगळावेगळा निर्णय जाहीर केला आहे. ज्या पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश दिला, त्या सर्व पालकांची घरपट्टी स्वतःच्या खर्चातून भरण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

ग्रामीण भागातील सरकारी मराठी शाळा टिकून राहाव्यात, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संस्कार आणि सर्वांगीण विकासाची संधी मिळावी, या उद्देशातून हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गावाचा विकास केवळ भौतिक सुविधांपुरता मर्यादित न ठेवता, भविष्यातील नागरिक घडवणाऱ्या शिक्षण व्यवस्थेला बळ देणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सरपंच सचिन पाटील यांनी सांगितले की, जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासह संस्कार आणि सामाजिक जाणीव निर्माण होते. त्यामुळे गावातील विद्यार्थ्यांनी गावातच दर्जेदार शिक्षण घ्यावे, यासाठी ग्रामपंचायतीमार्फत शैक्षणिक आणि भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून शाळांमध्ये मोफत शुद्ध आरओ पाणी देखील पुरविण्यात येणार आहे.
याबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, अनेक ग्रामपंचायतींनी घरपट्टी माफीची घोषणा केली असली तरी शासन नियमांमध्ये तशी तरतूद नसल्याने ते ही रक्कम स्वतःच्या खर्चातून भरणार आहेत.
डांगरी येथेही शिक्षण प्रोत्साहनासाठी पुढाकार
दरम्यान, तालुक्यातील डांगरी येथील केंद्रप्रमुख किरण भरतराव शिसोदे (बाळा मास्तर) यांनीही शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष उपक्रम जाहीर केला आहे. त्यांच्या डांगरी गावातील इयत्ता दुसरी ते चौथीमध्ये जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या पाच विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी आणि पाणीपट्टी ते स्वतः भरणार आहेत. हा उपक्रम त्यांनी त्यांच्या वडील कै. भरतराव पंडितराव शिसोदे यांच्या स्मरणार्थ जाहीर केला असून, भरलेली रक्कम पावतीसह संबंधित पालकांना दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या दोन्ही उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
