स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीजबिलांचा प्रश्न; अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे महावितरणला निवेदन.
अमळनेर |आबिद शेख

अमळनेर शहरात स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांना दुप्पट-तिप्पट वीजबिले येत असल्याच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेरच्या वतीने महावितरण कंपनीच्या अमळनेर उपविभाग क्रमांक १ चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता धनंजय धांडे यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे आणि चिंतेचे वातावरण आहे. जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक रकमेची वीजबिले येत असल्याचा अनुभव येत असल्याने या प्रकरणाची सखोल दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

ग्राहक संरक्षण कायदा २०१९ आणि वीज कायद्यानुसार ग्राहकांना संपूर्ण माहिती, पारदर्शकता आणि निवडीचा अधिकार मिळणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. मात्र, स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धती, बिलाची गणना आणि मीटर तपासणी प्रक्रियेबाबत ग्राहकांना पुरेशी माहिती दिली जात नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
स्मार्ट मीटरची कार्यपद्धती, त्याचे फायदे व मीटरच्या अचूकतेबाबत ग्राहकांना तांत्रिक माहिती देण्यात यावी. मीटरबाबत शंका असल्यास त्याची तपासणी कोणत्या प्रयोगशाळेत केली जाते, याची माहितीही पारदर्शकपणे उपलब्ध करून द्यावी. तसेच ग्राहकांच्या संमतीशिवाय जुने मीटर बदलू नयेत, अशी मागणी ग्राहक पंचायतने केली.
यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता धनंजय धांडे यांनी स्मार्ट मीटर संदर्भातील नागरिकांचे गैरसमज दूर करण्यासाठी लवकरच जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात येईल व सर्व शंकांचे समाधान केले जाईल, असे आश्वासन दिले.
निवेदन देताना विजय शुक्ला, मकसूद बोहरी, सुनील वाघ, सतीश देशमुख, नरेंद्र बाळू पाटील, भाऊसाहेब देशमुख, दिलीप सारजे आणि सुभाष पाटील घोडगावकर आदी उपस्थित होते.
