शविआ’चा सोमवारी निघणारा मोर्चा मुख्याधिकाऱ्यांच्या विनंतीमुळे तूर्त स्थगित पालिकेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ‘शविआ’ देणार आठ दिवसांचे ‘अल्टिमेटम’.
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर: शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका शहर विकास आघाडीने सोमवार, दि. 22 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता काढण्यात येणाऱ्या मोर्चासंदर्भात आज शनिवार, दि. 20 जून रोजी पालिका मुख्याधिकाऱ्यांना पूर्वसूचनेचे पत्र दिले.
त्याची पालिका प्रशासनाने अतिशय गंभीरतेने दखल घेऊन शहर विकास आघाडीच्या गटनेत्या सौ. जयश्रीताई पाटील यांना प्रस्तावित मोर्चा स्थगित करण्याची विनंती पालिका मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे दि. 20 जून रोजी सौ. जयश्रीताई पाटील यांनी ‘शविआ’चे सर्व नगरसेवक व पदाधिकारी यांची मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रावर निर्णय घेण्यासाठी दुपारी चार वाजता तातडीची बैठक घेतली. सदर बैठकीत मोर्चा तूर्त स्थगित करण्याचे ठरले. मात्र, सौ. जयश्रीताई पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांना मोबाईलवरून सोमवार, दि. 22 जून रोजी दुपारी चार वाजता ‘शविआ’सोबत चर्चा करण्यासाठी पालिकेत उपस्थित राहण्यास सांगितले.
सोमवार, दि. 22 जून रोजी सौ. जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘शविआ’चे सर्व नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी पालिकेत मुख्याधिकाऱ्यांसह सर्व विभागप्रमुखांसोबत शहरातील पाणी समस्येसह विविध नागरी सोयी-सुविधांचा जो बोजवारा उडाला आहे त्याबाबत चर्चा करणार आहेत. सदर बैठकीत उपस्थित केल्या जाणाऱ्या समस्याप्रधान प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालिकेला आठ दिवसांचे ‘अल्टिमेटम’ देण्यात येणार आहे. अन्यथा शहरातील लोकाभिमुख समस्यांच्या संदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अत्यंत आक्रमक व भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
दरम्यान, शनिवार, दि. 20 जून रोजी दुपारी चार वाजता झालेल्या बैठकीस सौ. जयश्रीताई पाटील यांच्यासह नगरसेवक डॉ. डिगंबर महाले, विजय कहारू पाटील, सचिन पाटील, शोभाबाई गढरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन राजपूत, जितेंद्र ठाकूर, नरेंद्र संदानशीव, विक्रांत पाटील, मुक्तार खाटीक, विजय राजपूत, नसरोद्दीन हाजी, सयाजीराव पाटील, नरेंद्र चौधरी, ॲड. यज्ञेश्वर पाटील, भूषण भदाणे, निलेश महाजन, संजय भिला पाटील, इम्रान खाटीक, गौरव महाजन, दुर्गेश पाटील, सुनील शिंपी, आशाबाई चावरिया, आरिफ मेवाती, तुषार संदानशीव, वेद पाटील आदी उपस्थित होते.
शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी आम्ही तूर्तास संयमाची भूमिका घेतली आहे. मात्र, पालिकेने अमळनेरकरांसह आमच्या सहनशीलतेचा जास्त अंत पाहू नये. अन्यथा मोठा उद्रेक अटळ आहे.
सौ. जयश्रीताई पाटील, गटनेत्या, ‘शविआ’.
—
