राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात युवक संवाद कार्यक्रम; NEET घोटाळ्याविरोधात पदयात्रा व निवेदन.
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – जळगाव जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस व अमळनेर विधानसभा युवक काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने आज अमळनेर येथे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव शाम्भवी शुक्ला तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा व मिरा-भायंदर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या आफरीन सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीपराव पवार होते. कार्यक्रमाची सुरुवात NEET पेपरफुटी प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा स्वागत समारंभ पार पडला तसेच राहुल गांधी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी युवकांना संघटनात्मक कार्य, सामाजिक सहभाग आणि राजकीय नेतृत्व याबाबत मार्गदर्शन केले. युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेश दगडु पाटील यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव आशुतोष पवार, किरण पाटील व तुषार संदानशिव यांनी युवक काँग्रेसच्या आगामी कार्यक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमात जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस मनोज पाटील, प्रवक्ते संदीप घोरपडे, जेष्ठ नेते देवेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे, अल्पसंख्याक सेल जिल्हा सचिव रज्जाक शेख, मौर्य क्रांती संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा सेवादल तालुकाध्यक्ष बन्सीलाल भागवत गुरुजी, मगन भाऊसाहेब पाटील, आदिवासी सेल तालुकाध्यक्ष रावसाहेब पवार तसेच युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सईद तेली यांनीही युवकांना संबोधित केले.
यावेळी ऑल इंडिया काँग्रेस कमिटी (AICC) च्या संघटन सृजन अभियानांतर्गत निवड झालेल्या विविध फ्रंटल व सेलच्या अध्यक्षांचा युवक काँग्रेसच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. सेवादल, ओबीसी सेल, अनुसूचित जाती विभाग, आदिवासी सेल, अल्पसंख्याक सेल तसेच सोशल मीडिया विभागातील नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
बैठकीनंतर युवक काँग्रेसच्या वतीने NEET परीक्षेतील कथित घोटाळ्याविरोधात मराठा मंगल कार्यालय ते तहसीलदार कार्यालय अशी पदयात्रा काढण्यात आली. यानंतर उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली तसेच NEET पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
याशिवाय, येत्या २१ तारखेला होणाऱ्या NEET परीक्षेसाठी बाहेरगावी परीक्षा केंद्र मिळालेल्या विद्यार्थी व पालकांना प्रवेशपत्राच्या आधारे मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.
या कार्यक्रम व आंदोलनासाठी चाळीसगाव, पाचोरा, अमळनेर, एरंडोल, धरणगाव तसेच जिल्ह्यातील विविध भागांतील युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर महाले यांनी केले तर आभार प्रदर्शन गौरव देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माजी शहराध्यक्ष तथा नगरसेवक मनोज पाटील, तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे, शरद पाटील व राकेश पवार यांनी विशेष प्रयत्न केले.
