RTE विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुलीचा आरोप; सायरा देवी बोहरा स्कूलविरोधात चौकशीची मागणी.

0

अमळनेर | आबिद शेख 


अमळनेर येथील सायरा देवी बोहरा स्कूलमध्ये शिक्षण हक्क कायदा (RTE) अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शासन नियमांचे उल्लंघन करून आयटी शुल्क व इतर विविध शुल्काच्या नावाखाली सुमारे ₹७ हजारांची वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पत्रकार हितेंद्र जगन्नाथ बडगुजर यांनी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती अमळनेर यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज सादर करून चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली आहे.


तक्रारीनुसार, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक १ जुलै २०२५ च्या आदेशानुसार RTE अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य, गणवेश, पाठ्यपुस्तके, वह्या, स्कूल बॅग व इतर सुविधा मोफत देण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र संबंधित शाळेत या आदेशाकडे दुर्लक्ष करून पालकांकडून विविध कारणे दाखवत शुल्क आकारले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


याशिवाय पालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुल्क ऑनलाइन स्वीकारण्यास नकार देत रोख रक्कम घेण्याचा आग्रह केला जात असून रक्कम घेतल्यानंतर अधिकृत पावती दिली जात नसल्याचाही दावा करण्यात आला आहे. त्यामुळे व्यवहाराच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
तक्रारदारांनी संबंधित प्रकरणाची तातडीने चौकशी करून शासन आदेशाचे उल्लंघन झाले आहे का याची पडताळणी करावी, शुल्क आकारणीचा कायदेशीर आधार तपासावा तसेच दोषी आढळल्यास संबंधित संस्थाचालक, मुख्याध्यापक व जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
तसेच पालकांकडून वसूल केलेली रक्कम परत देण्याबाबत आदेश काढावेत आणि केलेल्या कारवाईचा अहवाल लेखी स्वरूपात देण्यात यावा, अशीही मागणी अर्जातून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *