शिवशक्ती चौक–सोनेनगर रस्ता बंद; नागरिकांच्या गैरसोयीवर उपाययोजनांसाठी माजी नगरसेवक मुख्तार खाटीक यांची पुढाकार.
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : शिवशक्ती चौक ते सोनेनगर या मार्गावरील नाल्यावरील पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परिणामी परिसरातील नागरिक, विद्यार्थी, कामगार तसेच वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असून दैनंदिन प्रवास विस्कळीत झाला आहे.

या गंभीर समस्येची दखल घेत माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी शहराध्यक्ष मुख्तार अख्तर खाटीक यांनी संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी विप्रो कंपनीच्या एचआर अधिकाऱ्यांची भेट घेऊन नागरिकांच्या अडचणींची सविस्तर माहिती दिली.
यावेळी खाटीक यांनी विप्रो कंपनीसमोरील पर्यायी रस्ता तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली. यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळेल तसेच वाहतुकीवरील ताण कमी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय परिसरातील सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित करत रेल्वे बोगदा, शिवशक्ती चौक तसेच सानेनगर रस्ता या महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी करण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही उपाययोजना महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावर विप्रो कंपनीच्या एचआर अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या विषयावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक प्रस्ताव पुढे मांडण्याचे आश्वासन दिले. तसेच रस्ता खुला करणे आणि सीसीटीव्ही बसविण्याबाबत शक्य ती कार्यवाही करण्याचे संकेत दिले.
या भेटीदरम्यान रावसाहेब पैलवान, शालिक पाटील, प्रकाश सोनवणे आणि नानाभाऊ उपस्थित होते.
नागरिकांच्या हितासाठी आणि परिसरातील सुरक्षिततेच्या दृष्टीने या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात, अशी अपेक्षा मुख्तार अख्तर खाटीक यांनी व्यक्त केली.
