नीट (UG) २०२६ फेरपरीक्षेपूर्वी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी; NTA ची अधिकृत घोषणा.
24 प्राईम न्यूज 17 Jun.

नवी दिल्ली, दि. १६ : राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ने नीट (UG) २०२६ फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर भारतात टेलिग्राम प्लॅटफॉर्मवर मर्यादित कालावधीसाठी कारवाई करण्यात आल्याची अधिकृत माहिती दिली आहे. ही कारवाई विद्यार्थ्यांच्या हितासाठी तसेच परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी करण्यात आली असल्याचे NTA ने स्पष्ट केले.

NTA च्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील कलम ६९(A) अंतर्गत टेलिग्रामवर भारतात प्रवेश मर्यादित करण्याचे निर्देश दिले आहेत. ही बंदी २२ जून २०२६ पर्यंत लागू राहणार असून त्यात २१ जून रोजी होणाऱ्या नीट (UG) २०२६ फेरपरीक्षेचा कालावधी आणि त्यानंतरचा तातडीचा कालावधी समाविष्ट आहे.
याशिवाय, टेलिग्रामवरील आधी पोस्ट केलेल्या संदेशांमध्ये संपादन (Message Editing) करण्याच्या सुविधेवरही भारतात ३० जून २०२६ पर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. या सुविधेचा वापर करून परीक्षेतील कथित पेपरफुटीचे बनावट पुरावे तयार केल्याच्या तक्रारी समोर आल्याचे NTA ने म्हटले आहे.

NTA ने सांगितले की, काही संघटित फसवणूक रॅकेट्सकडून नीट (UG) २०२६ फेरपरीक्षेतील विद्यार्थ्यांची दिशाभूल आणि आर्थिक फसवणूक करण्यासाठी टेलिग्रामचा वापर केला जात होता. यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली.
या संपूर्ण कारवाईदरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बिहार, गुजरात आणि राजस्थानसह विविध राज्यांतील पोलिस यंत्रणा आणि NTA कडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक टेलिग्राम चॅनेल, गट आणि बॉट्सवर कारवाई करून ते हटवण्यात आले.
NTA ने या निर्णयासाठी इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे आभार मानले असून, यामुळे २१ जून रोजीची नीट फेरपरीक्षा अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने घेण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
