जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत तीन जागा बिनविरोध; उमेदवारी माघारीनंतर ९ नोव्हेंबरला अंतिम चित्र स्पष्ट होणार आमदार अमोल पाटील यांच्या पत्नी मनिषा पाटील आणि मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा.
24 प्राईम न्यूज 1 Nov 2026

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत एकूण १०९ अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी २ नोव्हेंबर रोजी होणार असून, ३ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्यापासून जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, तीन जागांवर प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या जागा बिनविरोध झाल्या आहेत. एरंडोल मतदारसंघातून आमदार अमोल पाटील यांच्या पत्नी मनिषा पाटील, पारोळा मतदारसंघातून नलिनी चिमणराव पाटील आणि भुसावळ मतदारसंघातून मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
आता उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर आणि माघारीच्या मुदतीनंतर निवडणुकीतील लढतींचे नेमके स्वरूप समोर येणार असून, जिल्ह्यातील राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

