वामन नगरात पाणीटंचाई; महिलांचा नगरपालिकेत धडक देत आंदोलनाचा इशारा.

0

आबिद शेख/अमळनेर 


अमळनेर, दि. १५ : शहरातील पिंपळे रोडवरील वामन नगर परिसरात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा आणि नवीन व्हॉल बसवून दोन ते तीन दिवसांत नियमित पाणी मिळावे, या मागणीसाठी महिलांनी सोमवारी (दि. १५) नगरपालिकेत जाऊन निवेदन दिले.
महिलांच्या म्हणण्यानुसार, दि. १२ रोजी करण्यात आलेल्या पाणीपुरवठ्यादरम्यान वामन नगर परिसराला केवळ अर्धा तास पाणी मिळाले. यापूर्वीही अशाच प्रकारे अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी १२ मार्च २०२६ रोजी व्हॉलमन, नगरसेवक, पाणीपुरवठा सभापती आणि मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. तसेच वेळोवेळी फोनद्वारेही समस्या मांडण्यात आली, मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.


यावेळी महिलांनी वामन नगरसाठी नवीन व्हॉल बसविण्यात यावा किंवा पिंपळे रोडच्या मुख्य पाईपलाईनला जोडणी करून नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली.
दरम्यान, महिलांनी नगरपालिकेत भेट दिली असता मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि पाणीपुरवठा सभापती उपस्थित नसल्याने त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे निवेदन सुपूर्द केले.


येत्या आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत व पुरेशा प्रमाणात करण्यात आला नाही, तर पुढील काळात मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा तोंडी इशारा महिलांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed