शेती पंपांसाठी शेतकऱ्यांना अखंड वीज द्या – आ. अनिल पाटील महावितरण अधिकाऱ्यांसोबत बैठक; वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना.
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन अमळनेरचे अनिल भाईदास पाटील यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेत शेती पंपांच्या वीजपुरवठ्याबाबत सविस्तर चर्चा केली. पेरणी, रोपलावणी व पिकांना वेळेवर पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांना नियमित व खंडमुक्त वीज देण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
बैठकीत शेतकऱ्यांकडून सातत्याने होत असलेल्या मागण्यांचा विचार करून शेती पंपांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले. रोस्टिंग किंवा लोडशेडिंगचा परिणाम शेती पंपांवर होऊ नये यासाठी स्वतंत्र फीडरद्वारे अथवा ठराविक वेळेत किमान ८ तास दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली.

तसेच 220 केव्ही व 33 केव्ही उपकेंद्रांवरील तांत्रिक दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करून ट्रिपिंग व वीज खंडाचे प्रमाण कमी करण्यावर भर देण्यात आला. वीज तुटणे, कमी दाब यांसारख्या समस्यांवर शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी स्थानिक पातळीवरील यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

यावेळी आ. अनिल पाटील म्हणाले, “शेतकरी हा देशाचा कणा आहे. पेरणीच्या काळात त्यांना वीजेची सर्वाधिक गरज असते. त्यामुळे महावितरणने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत अखंड व दर्जेदार वीजपुरवठा करावा.”
महावितरण अधिकाऱ्यांनी आमदारांच्या सूचनांची नोंद घेत लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीमुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
