उत्साहात साजरा झाला शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत.

0

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जवखेडा येथे सोमवारी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून, पुष्पगुच्छ देत त्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. विविध शैक्षणिक उपक्रमांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवर, पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते फीत कापून प्रवेशोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे विशेष स्वागत करण्यात आले. तसेच ‘पहिले पाऊल’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची संस्मरणीय सुरुवात नोंदविण्यात आली.


यानंतर मेळावा क्र. २ अंतर्गत विविध शैक्षणिक स्टॉल्सचे आयोजन करण्यात आले. या स्टॉल्सद्वारे विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, भावनिक आणि भाषिक विकासासाठी विविध कृती व उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.
यावेळी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशांचे वितरण करण्यात आले. तसेच मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहारासह मिष्ठान्न देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून आले.
या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान पाटील, उपाध्यक्षा सपना पाटील, सदस्य जिजाबराव पाटील, रविंद्र माळी, डॉ. प्रफुल्ल पाटील, मुकेश माळी, पालक प्रतिनिधी आनंद भिल, मुख्याध्यापक छगन पाटील, शिक्षक रत्नप्रभा साळुंखे, रेखा पाटील, सुनिता पाटील, अर्चना बागुल, मुकेश पाटील, माधवराव ठाकरे तसेच अंगणवाडी सेविका आक्काबाई पाटील, संजीवनी पाटील, आशा पाटील व सुनंदा पाटील यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“कर्म हिच मानू सेवा, धरू शिक्षणाची कास; अविरत करू कष्ट, घडवूनी विद्यार्थ्यास” या ब्रीदवाक्याला साजेसा हा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड आणि शाळेविषयी आत्मीयता निर्माण करणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed