प्रताप हायस्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहात; विद्यार्थ्यांचे पुष्प व शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत.

0

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर: येथील प्रताप हायस्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शाळा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या परिसरात आकर्षक रांगोळी, पताका सजावट आणि विविध संदेशपर फलकांमुळे उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.
प्रवेशोत्सवानिमित्त शाळेचे चेअरमन नीरजा अग्रवाल, कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन, भांडारकर शाळेचे चेअरमन प्रदीप अग्रवाल, मुख्याध्यापिका श्रीमती एस. पी. बावीस्कर तसेच शिक्षक प्रतिनिधी डी. एन. पालवे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर शालेय प्रार्थना व राष्ट्रगीत सादर करण्यात आले. प्रताप शेठजी, साने गुरुजी आणि सरस्वतीमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती बावीस्कर यांनी केले. यावेळी अमळनेर शहरातील विविध दात्यांनी उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक साहित्याचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, सहा वहींचा संच, कंपास पेटी, दप्तर आणि शालेय गणवेश प्रदान करण्यात आले.


शाळा ११८ व्या वर्षाकडे वाटचाल करीत असल्याने प्रवेशोत्सवाला पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. साहित्य वितरणाचे नियोजन एन. आर. पाटील, सचिन अहिरे, नम्रता दोरकर, जयश्री पाटील, सागर पवार आणि प्रसाद गोसावी यांनी पाहिले. तर शिस्त व्यवस्थेची जबाबदारी लक्ष्मण पाटील व के. जी. कोळी यांनी सांभाळली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. ए. खांजोडकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डी. एन. पालवे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed