वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर अमळनेर विभागात मोठी कारवाई; दीड महिन्यात ७७१ वाहनांवर दंड, ७.९२ लाखांची वसुली.
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : नागरिकांकडून वाहतुकीचे नियम सातत्याने पाळले जात नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमळनेर विभागीय पोलिसांनी विशेष मोहीम राबवत गेल्या दीड महिन्यात ७७१ वाहनांवर कारवाई करून तब्बल ७ लाख ९२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. अशी माहिती विभागीय पोलिस उपअधीक्षक (डीवायएसपी) विनायक कोते यांनी दिली.

वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, अन्यथा पुढील काळात आणखी कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
वाहतुकीदरम्यान मद्यपान करून वाहन चालवणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, परवान्याशिवाय वाहन चालवणे, अल्पवयीन मुलांना वाहन देणे, हेल्मेटचा वापर न करणे, रस्त्यावर कुठेही वाहन उभे करणे तसेच तांत्रिकदृष्ट्या खराब वाहने वापरणे यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

विभागनिहाय कारवाई
अमळनेर हद्दीत – अवैध प्रवासी वाहतूक (कलम ६६/१९२) अंतर्गत २० वाहनांवर, मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या १६ चालकांवर आणि इतर ४०१ वाहनांवर कारवाई; ४ लाख ८९ हजार १०० रुपये दंड
पारोळा हद्दीत – अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ९, मद्यपान करणाऱ्या ४ आणि इतर ६५ वाहनांवर कारवाई; ६० हजार २०० रुपये दंड
एरंडोल हद्दीत – अवैध प्रवासी वाहतूक १४, मद्यपान करून वाहन चालवणारे १६ आणि इतर १५२ वाहनांवर कारवाई; १ लाख ३२ हजार ६०० रुपये दंड
मारवड हद्दीत – अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ७ आणि इतर ६७ वाहनांवर कारवाई; १ लाख १० हजार २०० रुपये दंड
डीवायएसपी विनायक कोते यांनी सांगितले की, अवैध प्रवासी वाहतूक, कर्कश सायलेन्सर, मद्यपान करून वाहन चालवणे, भरधाव वेग आणि बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार आहे. कारवाईचा उद्देश नागरिकांना शिक्षा करणे नसून शिस्त लावणे आणि अपघात टाळणे हा आहे. मात्र नागरिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाल्यास कठोर भूमिका घ्यावी लागेल.
