नवागाव येथे शिक्षण जागृती मोहिमेचा प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न.
चाळीसगांव मंगेश दादा मित्र मंडळ आणि मौलाना आझाद लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने नवागाव येथील मोहम्मदिया मस्जिदजवळ शिक्षण जागृती मोहिमेअंतर्गत विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजात शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेख अलाउद्दीन भाईसाहेब होते. प्रमुख पाहुणे म्हणून पीएसआय हरून मिर्झा उपस्थित होते. यावेळी हुस्नोदिन जनाब, अफसर सर, दस्तगीर जनाब, हाजी इक्बाल कुरेशी, हाजी रफिक, बुरहान भाई, अनिस कुरेशी, रशीद शाह, हाजी जमशेर मौलाना, मौलाना अबुजर, सलीम तात्या, इत्तू पैलवान, अमजद कुरेशी, अल्ताफ कुरेशी, शफी मण्यार, महमूद कुरेशी, डॉ. आवेश यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकात रफिक मण्यार यांनी शिक्षण जागृती मोहिमेची माहिती देताना सांगितले की, शेख अलाउद्दीन दादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या ३० वर्षांपासून ही मोहीम सातत्याने राबवली असून समाजात शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचे कार्य केले आहे. शिक्षणाच्या माध्यमातून कुटुंब, समाज आणि देशाचा विकास साधावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
हुस्नोदिन जनाब यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाद्वारे स्वतःची आणि कुटुंबाची प्रगती साधण्याचे आवाहन केले. अफसर सर यांनी विद्यार्थ्यांनी परिश्रमाची तयारी ठेवून आपले ध्येय निश्चित करावे आणि त्यावर लक्ष केंद्रित करावे, असे मार्गदर्शन केले.
दस्तगीर जनाब यांनी आपल्या मनोगतात शेख अलाउद्दीन दादा यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, शैक्षणिक कर्ज व करिअर मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे. त्यांच्या या कार्यामुळे शेकडो विद्यार्थी डॉक्टर, अभियंता आणि विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यावसायिक बनले आहेत.
अध्यक्षीय भाषणात शेख अलाउद्दीन भाई यांनी प्रत्येक घरातून डॉक्टर, अभियंता आणि सुशिक्षित नागरिक घडावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी आर्थिक अडचणींची चिंता न करता शिक्षण पूर्ण करावे व देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण नेहमी त्यांच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रफिक मण्यार यांनी केले, तर आभार प्रदर्शन जमशेद मौलाना यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रियाज प्रिन्स आणि मनतजीम शेख (मॉन्टी) यांनी विशेष परिश्रम घेतले.
