दोधवद गावठाण परिसरातील पडीत जंगलाला भीषण आग; अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.

0

आबिद शेख/अमळनेर 

अमळनेर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दोधवद हद्दीतील गावठाण परिसरालगतच्या पडीत जंगलामध्ये आज दुपारी सुमारे ३ वाजेच्या दरम्यान भीषण आग लागून तिने रौद्र रूप धारण केले. शेतकरी आपल्या शेताकडे जात असताना आगीचे धगधगते स्वरूप त्यांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले.

ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र कोरडे गवत, पडीत जंगल आणि वाऱ्याचा वेग यामुळे आगीने विक्राळ स्वरूप धारण केले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच समर्थ किचन ट्रॉलीचे संचालक जितेंद्र पाटील यांनी अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी (सीओ) साहेब यांच्याशी थेट संपर्क साधून, “साहेब, आमच्या गावावर मोठे संकट आले आहे, कृपया तातडीने मदतीसाठी धावून या,” अशी भावनिक विनंती केली. या विनंतीची दखल घेत सीओ साहेबांनी तत्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना केल्या.

घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलातील फायरमन दिनेश बिराडे, फारुक शेख, वाहन चालक सत्यम भाऊ, रफिक खान आणि आकाश संतांशू यांनी जीव धोक्यात घालून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. धूर, उष्णता आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने आग रोखण्यासाठी मोठे योगदान दिले.

या भीषण आगीत अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील शेतीपंपांच्या वायरी, पीव्हीसी पाईप, ठिबक सिंचन साहित्य, कुंपण तसेच इतर शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कष्टाने उभे केलेले साहित्य काही क्षणांत आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ज्यासाठी वर्षानुवर्षे घाम गाळला, ते सर्व डोळ्यांसमोर जळताना पाहून अनेक शेतकऱ्यांचे डोळे पाणावले.

आगीने केवळ जंगलच जाळले नाही, तर अनेक कुटुंबांच्या आशा, मेहनत आणि उद्याच्या स्वप्नांनाही मोठा फटका दिला आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांकडून होत आहे.

या संकटाच्या काळात ग्रामस्थांची एकजूट, अग्निशमन दलाचे धाडस आणि प्रशासनाची तत्परता यामुळे मोठी जीवितहानी टळली असली, तरी या आगीच्या जखमा दोधवद परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या मनावर दीर्घकाळ कायम राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed