मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे प्रकल्पामुळे जळगाव-धुळे थेट रेल्वेने जोडले जाणार.

0
112.png

आबिद शेख/अमळनेर
उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची आणि विकासाला चालना देणारी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मनमाड-धुळे-इंदूर नवीन रेल्वे प्रकल्पामुळे जळगाव आणि धुळे ही दोन प्रमुख शहरे प्रथमच थेट रेल्वेमार्गाने जोडली जाणार आहेत.
सुमारे ३०९ किलोमीटर लांबीच्या या रेल्वे प्रकल्पासाठी अंदाजे १८ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या जळगावहून धुळ्याला रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना मोठा वळसा घालावा लागतो. त्यामुळे प्रवासाचा वेळ आणि अंतर वाढते. मात्र नवीन रेल्वेमार्ग सुरू झाल्यानंतर दोन्ही शहरांमधील प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि कमी खर्चिक होणार आहे.


या प्रकल्पात नरडाणा येथे महत्त्वाचे रेल्वे जंक्शन विकसित करण्यात येणार असून रेल्वे बायपासच्या माध्यमातून धुळे आणि जळगाव यांच्यात थेट रेल्वे संपर्क निर्माण होणार आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत मिळणार आहे.


विशेष म्हणजे या रेल्वेमार्गामुळे जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील सुमारे एक हजार गावे रेल्वे नेटवर्कशी जोडली जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना केळी, कापूस तसेच इतर कृषी उत्पादनांची वाहतूक आणि बाजारपेठांपर्यंत पोहोच अधिक सुलभ होणार आहे.
याशिवाय दोन्ही जिल्ह्यांतील औद्योगिक क्षेत्रांनाही या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार असून उद्योगवृद्धीबरोबरच रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सध्या प्रकल्पासाठी भूसंपादनाचे काम सुरू असून रेल्वे प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून कामाला गती देण्यात येत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक आणि कृषी विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed