जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अमळनेरमध्ये विविध पर्यावरणपूरक उपक्रम; 1000 सीडबॉल निर्मिती व वृक्षारोपण.
अमळनेर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अमळनेर नगरपरिषद व महिला हाउसिंग ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियान 2026 व माझी वसुंधरा अभियान 7.0 अंतर्गत विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

दिनांक 4 जून 2026 रोजी इंदिरा गांधी भवन येथे सीडबॉल बनवण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेदरम्यान सुमारे 1000 सीडबॉल तयार करण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि हरित क्षेत्र वाढीसाठी सीडबॉल उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

त्यानंतर 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ओंकार नगर येथे “एक पेड़ माँ के नाम” अभियानांतर्गत अमळनेर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनाची हरित शपथ घेतली.

या प्रसंगी नागरिक, नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी यांना घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2026 अंतर्गत लागू करण्यात आलेल्या नियमांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच घनकचरा व्यवस्थापन अधिनियमाची माहितीपत्रकेही वितरित करण्यात आली.
दरम्यान, नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत शहरातील 1 ते 18 प्रभागांतील मुकादमांसाठी स्वच्छता विभाग कार्यालयात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2026 मधील विविध नियम, जबाबदाऱ्या व अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित सर्व मुकादमांना हरित शपथ देण्यात आली तसेच अधिनियमाची माहिती असलेली प्रतही वितरित करण्यात आली.
या उपक्रमांना नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, विविध प्रभागांतील नगरसेवक, आरोग्य सभापती, स्वच्छता विभागाचे निरीक्षक, शहर समन्वयक, कर्मचारी, महिला हाउसिंग ट्रस्टच्या पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष डॉ. बाविस्कर यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व अधोरेखित करत पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. तसेच “अमळनेर शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित बनवण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे,” असे आवाहन त्यांनी केले.
