जळगाव विधानपरिषद निवडणुकीत चौरंगी लढत; महायुती, महाविकास आघाडीसह बंडखोरांचे आव्हान.

आबिद शेख/अमळनेर
जळगाव : जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून आता या मतदारसंघात चौरंगी लढत रंगणार आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र अखेर चार उमेदवार मैदानात कायम राहिल्याने राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.

या निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांकडून मतदान केले जाणार आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे 630 मतदार आहेत. त्यापैकी भाजपकडे जवळपास 250 मतांचे बळ असल्याचे मानले जात आहे, तर शिवसेनेच्या शिंदे गटाकडे सुमारे 165 मते असल्याची माहिती आहे. उर्वरित मते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना तसेच इतर पक्ष आणि अपक्ष सदस्यांकडे आहेत.

महायुतीच्या वतीने भाजपचे नंदकिशोर महाजन निवडणूक रिंगणात आहेत. महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे शरद तायडे यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या रश्मी काळे यांनी बंडखोर भूमिका कायम ठेवत उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. तसेच संतोष चौधरी हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.
चार उमेदवार मैदानात असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांची मते नेमकी कोणाच्या पारड्यात पडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेषतः महायुतीतील अंतर्गत राजकीय समीकरणे, बंडखोर उमेदवारीचा परिणाम आणि अपक्ष उमेदवाराला मिळणारा पाठिंबा हे निकाल ठरविणारे महत्त्वाचे घटक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने सर्वच उमेदवारांनी मतदारांशी संपर्क, बैठका आणि प्रचाराला वेग दिला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असून 18 जून रोजीच्या मतदानानंतर या चुरशीच्या चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
