मयत सभासदांच्या नावावर बोगस मतदानाचा आरोप; शेतकरी संघ निवडणुकीचा निकाल स्थगित ठेवण्याची मागणी.

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर : अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघ लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत (२०२५ ते २०३०) मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोप करत काही उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज सादर करून निकाल जाहीर न करण्याची मागणी केली आहे.

उमेदवार गिरीश सोनजी पाटील, सौ. कल्याणी दिनेश साळुंखे व किरणगिर भरतगिर गोसावी यांनी दिलेल्या अर्जात नमूद केले आहे की, दिनांक ३० मे २०२६ रोजी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान सुमारे ५ हजार मयत सभासदांपैकी अंदाजे ७०० ते ८०० सभासदांच्या नावावर बोगस मतदान झाल्याची गंभीर शंका आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अर्जदारांनी प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदान झालेल्या मतदारांची यादी, मतदानाची नोंद असलेली प्रमाणित प्रत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच या आक्षेपांची चौकशी पूर्ण होईपर्यंत निवडणुकीचा अंतिम निकाल घोषित करू नये, कोणत्याही उमेदवाराला विजयी घोषित करू नये व निवड प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणीही करण्यात आली आहे.

अर्जात पुढे नमूद करण्यात आले आहे की, जर चौकशी न करता निकाल जाहीर करण्यात आला तर न्यायालयीन तसेच इतर कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्यात येईल. त्यातून उद्भवणाऱ्या परिणामांची जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असा इशाराही अर्जदारांनी दिला आहे.
दरम्यान, या तक्रारीमुळे शेतकरी संघाच्या निवडणूक प्रक्रियेबाबत नव्या चर्चांना उधाण आले असून निवडणूक प्रशासन याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
