जिल्हाधिकाऱ्यांचा लोकाभिमुख उपक्रम : दर गुरुवारी उपविभाग स्तरावर ‘जनसमाधान बैठक’; नागरिकांच्या तक्रारींचे होणार जलद निवारण.

24 प्राईम न्यूज 30 May 2026
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या, तक्रारी व प्रशासकीय अडचणींचे स्थानिक स्तरावरच जलद आणि प्रभावी निवारण व्हावे, या उद्देशाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून “जनसमाधान बैठक” हा लोकाभिमुख उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी स्वतः दर गुरुवारी संबंधित उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या ऐकणार आहेत.
या उपक्रमामुळे नागरिकांना आपल्या न्याय्य मागण्या व प्रलंबित प्रशासकीय विषयांसाठी जळगाव जिल्हा मुख्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण क्षेत्रीय स्तरावरच कालबद्ध पद्धतीने करण्यावर भर देण्यात आला आहे.

‘जनसमाधान पोर्टल’ आणि क्यूआर कोडची सुविधा
जनसमाधान बैठकीत प्राप्त होणारे सर्व अर्ज तत्काळ स्कॅन करून ‘जनसमाधान पोर्टल’वर नोंदविले जाणार आहेत. प्रत्येक अर्जाला स्वतंत्र क्यूआर कोड देण्यात येईल. नागरिक आपल्या मोबाईलद्वारे हा क्यूआर कोड स्कॅन करून अर्जाची सद्यस्थिती, संबंधित विभागाकडून झालेली कार्यवाही आणि निवारणाची प्रगती घरबसल्या पाहू शकतील.
प्रलंबित अर्जांबाबत संबंधित विभागांना पोर्टलद्वारे स्वयंचलित स्मरणपत्रे पाठविण्यात येणार असून तक्रार निवारण प्रक्रियेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि गती निर्माण होणार आहे.
हे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत

जनसमाधान बैठकीत माहितीचा अधिकार (RTI) अंतर्गत अर्ज, लोकशाही दिनासाठीचे अर्ज, भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे सादर करावयाच्या तक्रारी, न्यायप्रविष्ट प्रकरणे तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या व सेवाविषयक अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
पहिल्या फेरीचे वेळापत्रक
फैजपूर उपविभाग – ४ जून २०२६
पाचोरा उपविभाग – ११ जून २०२६
भुसावळ उपविभाग – १८ जून २०२६
चाळीसगाव उपविभाग – २५ जून २०२६
अमळनेर उपविभाग – २ जुलै २०२६
जामनेर (प्रस्तावित) उपविभाग – ९ जुलै २०२६
जळगाव उपविभाग – १६ जुलै २०२६
एरंडोल उपविभाग – २३ जुलै २०२६
प्रत्येक उपविभागात साधारण दोन महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा जनसमाधान बैठक आयोजित केली जाणार आहे.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले असून, विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांनी आपल्या रास्त तक्रारी व निवेदनांसह नियोजित दिवशी बैठकीस उपस्थित राहावे, असे म्हटले आहे.
