सावखेडा नदीपात्रातील अवैध डिझेल साठ्यावर प्रशासनाचा दणका; जप्त इंधन विक्रीस मंजुरी.

0
New Doc 05-30-2026 22.36

अमळनेर : तालुक्यातील सावखेडा येथील तापी नदीपात्रात आढळून आलेल्या अवैध डिझेल साठ्याबाबत संबंधित मालकाकडून मुदतीत समाधानकारक खुलासा न आल्याने जप्त करण्यात आलेले १४७० लिटर डिझेल शासन जमा करून त्याची विक्री करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी २९ मे रोजी दिले आहेत.
सावखेडा येथील वाळू ठेक्यांवर उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मंडळाधिकारी कल्याणी पाटील, प्रभारी पुरवठा निरीक्षक सचिन निकम आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या पथकाने अचानक छापा टाकला होता. यावेळी गिरीश तुळशीराम बेलदार यांच्या ताब्यात सुमारे १४७० लिटर डिझेलचा बेकायदेशीर साठा आढळून आला.


महसूल पथकाने सात कॅनमधील १४०० लिटर डिझेल आणि अन्य तीन कॅनमधील ७० लिटर डिझेल असा एकूण सुमारे १ लाख ५५ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला होता. या प्रकरणी अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच कलम ६ नुसार संबंधित मालकास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.
मात्र, निर्धारित मुदतीत कोणताही खुलासा सादर न झाल्याने प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी सदर डिझेल साठा जप्त करण्याचा अंतिम आदेश दिला. अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ६ व ६-अ नुसार जप्त मालाची विल्हेवाट लावण्याचे अधिकार प्राप्त असल्याने प्रशासनाने डिझेल विक्रीचा निर्णय घेतला.


यासाठी अमळनेर शहरातील विविध पेट्रोल पंपांकडून डिझेलचे दर मागविण्यात आले होते. त्यामध्ये धुळे रस्त्यावरील श्रीकृष्ण पेट्रोल पंप (नायरा) यांचा प्रतिलिटर १०१.५७ रुपये दर सर्वाधिक आढळून आल्याने जप्त डिझेल त्यांना विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डिझेल विक्रीतून प्राप्त होणारी संपूर्ण रक्कम क्रिमिनल डिपॉझिट (८४४३) या लेखाशीर्षकाखाली शासनाच्या खात्यात जमा करण्याचे आदेश प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी दिले आहेत. प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध इंधन साठवणूक व वाळू व्यवसायाशी संबंधित गैरप्रकारांवर प्रभावी अंकुश बसण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed