वाडी चौकातील ब्लॉक गटाराची सुटीच्या दिवशीही तात्काळ सफाई; रस्त्यावर वाहणारे पाणी केले सुरळीत.

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : शहरातील वाडी चौक परिसरात काही विघ्नसंतोषी लोकांनी मुद्दाम गटारीत कचरा टाकून गटार ब्लॉक केल्याची घटना समोर आली. त्यामुळे गटारीचे सांडपाणी रस्त्यावर वाहू लागून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

ही बाब लक्षात येताच नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेत सुटीच्या दिवशीही सफाई मोहीम राबवली. गटारीत साचलेला कचरा काढून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यात आला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या कामात आरोग्य निरीक्षक संतोष माणिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावण संदानशिव, शाम करंदीकर, प्रवीण बिऱ्हाडे आणि गौतम मोरे यांनी परिश्रम घेत गटार साफ करून रस्त्यावर वाहणारे पाणी सुरळीत केले.
नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता स्वच्छता राखण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
