शहरात बाटल्या आणि ड्रममधून पेट्रोल-डिझेल विक्रीला ऊत; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह..

0
New-Doc-05-22-2026-12.28.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : शहरात पेट्रोल आणि डिझेलची बाटल्या तसेच मोठमोठ्या ड्रममध्ये सर्रास विक्री होत असल्याचे चित्र समोर येत असून याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांपेक्षा बाटल्या, कॅन आणि ड्रम घेऊन येणाऱ्यांचीच अधिक गर्दी दिसून येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.


विशेष म्हणजे, इंधनाचा टँकर पंपावर पोहोचताच काही ठराविक ग्राहकांना फोन करून “या आणि ड्रम भरून घेऊन जा” असा निरोप दिला जात असल्याचा गंभीर आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे शहरात नियमबाह्य पद्धतीने इंधन विक्री सुरू असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.


नियमांनुसार पेट्रोल किंवा डिझेलची खुल्या स्वरूपात साठवणूक आणि विक्री धोकादायक मानली जाते. तरीदेखील शहरात दिवसाढवळ्या बाटल्या, कॅन आणि मोठ्या ड्रममध्ये इंधन भरून दिले जात असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एखाद्या ठिकाणी किरकोळ ठिणगी जरी पडली तरी मोठी दुर्घटना घडू शकते, याची जाणीव असूनही संबंधित विभाग आणि प्रशासन मात्र शांत असल्याचे दिसून येत आहे.
यामुळे “नेमकं कुणाच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू आहे?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. काही पेट्रोल पंप चालक नियमांना हरताळ फासत मोठ्या प्रमाणात इंधन विक्री करत असल्याने सामान्य वाहनधारकांना मात्र ताटकळत उभे राहावे लागत असल्याची नाराजीही व्यक्त होत आहे.
प्रशासनाने तातडीने शहरातील पेट्रोल पंपांची तपासणी करून बाटली आणि ड्रममधील इंधन विक्रीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. अन्यथा भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed