ऐंशी फुटी रस्त्यावर महिलेवर डुकराचा हल्ला; शहरात भीतीचे वातावरण..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : शहरातील ऐंशी फुटी रस्त्यावर रात्री फिरण्यासाठी गेलेल्या महिलेवर डुकराने अचानक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी (दि. 20) रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नगरपालिकेच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महावीर नगर येथील योगिता सहदेव पाटील या आपल्या मुलीसोबत मुंदडा नगर ते आर. के. नगर दरम्यानच्या ऐंशी फुटी रस्त्यावर रात्री फेरफटका मारत होत्या. यावेळी मागून आलेल्या डुकराने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून गुडघ्याच्या मागील बाजूस डुकराने चावा घेतल्याचे सांगण्यात आले.
घटनेनंतर त्यांच्या मुलीने धाडसाने प्रतिकार करत आरडाओरड केली. त्यामुळे स्थानिक नागरिक मदतीला धावून आले. जखमी योगिता पाटील यांना तात्काळ डॉ. अनिल शिंदे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, ऐंशी फुटी रस्त्यावर आठवडाभरात डुकरांच्या हल्ल्याची ही तिसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या रस्त्यावर दररोज रात्री मोठ्या संख्येने महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच शालेय विद्यार्थी फिरण्यासाठी येत असतात. शहरात मोकाट डुकरे, कुत्रे व जनावरांचा वाढता वावर नागरिकांसाठी धोकादायक ठरत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

नगरपालिकेचे स्पष्टीकरण
“गावात फिरणाऱ्या मोकाट जनावरांबाबत संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. मोकाट कुत्र्यांवरही बंदोबस्त करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी शालेय परिसरातील माहिती दिल्यास तत्काळ कारवाई केली जाईल. शहरातील डुक्कर पालन करणाऱ्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या असून आदेशाचे पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.”
— किरण कंडारे, स्वच्छता निरीक्षक, नगर पालिका अमळनेर
रवि ज्वेलर्स,
सराफ बाजार, अमळनेर,
Mob. 70 74 74 21 21.
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 152600
22 Ct सोने 91.60% : ₹. 142600
18 Ct सोने 75.00% : ₹. 117800
शुद्ध चांदी 999%:₹. 2660/-
भाव प्रती 10 ग्राम
