धावडे नदी पात्रातून वाळूची चोरटी वाहतूक; कारवाईची ग्रामस्थांची मागणी..

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर : तापी काठावरील धावडे येथील नदी पात्रातून गेल्या महिनाभरापासून मोठ्या प्रमाणावर वाळूची चोरटी वाहतूक सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, याबाबत तहसीलदारांना निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, तापी नदी परिसरातील सावखेडा, धावडे, मुंगसे, रुंधाटी व गंगापुरी या वाळू घाटांवर बेसुमार वाळू उपसा आणि वाहतूक सुरू आहे. त्यामुळे नदीपात्राची खोली वाढत असून पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. याचा भविष्यात पाणीटंचाईवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या डंपर वाहतुकीमुळे सावखेडा ते अमळनेर रस्त्याची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
धावडे येथील वाळू घाटावरून सावखेडा घाटाच्या कंत्राटदारांकडून बोटीच्या सहाय्याने वाळू चोरी केली जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. निविदेमध्ये बोटीने वाळू उपशाची कोणतीही तरतूद नसतानाही बेकायदा पद्धतीने बोटींचा वापर करून वाळू उपसा सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय, वाळू चोरट्यांकडून स्थानिक ग्रामस्थ व दक्षता समिती सदस्यांना धमकावणे, अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार घडत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
वाळू चोरीमुळे धावडेसह परिसरातील गावांवर पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ शकते. धावडे गावातून इतर गावांनाही पाणीपुरवठा होत असल्याने भविष्यात त्यांनाही याचा फटका बसण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, सरपंचांसह ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे निवेदन देऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
