महिलांच्या मदतीसाठी अमळनेरचे महिला समुपदेशन केंद्र ठरतेय आधारवड..

आबिद शेख अमळनेर
अमळनेर : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग, गृह विभाग तसेच पोलीस प्रशासनाच्या सहाय्याने आणि आधार बहुदेशीय संस्था, अमळनेर संचलित महिला समुपदेशन केंद्र हे जुने पोलीस स्टेशन (तहसील कार्यालय) आवारात कार्यरत असून, महिलांच्या विविध समस्यांवर प्रभावी समुपदेशन व मदतकार्य केले जात आहे.

केंद्रात समाजकार्य पदव्युत्तर प्रशिक्षित समुपदेशक कार्यरत असून महिलांना कायदेशीर, मानसिक व सामाजिक आधार दिला जात आहे.
महिला व बालक सहाय्य कक्षांतर्गत चालणाऱ्या या केंद्रामार्फत महिलांवर होणारा कौटुंबिक हिंसाचार, घरगुती वाद, भावनिक ताणतणाव, आर्थिक छळ, मुलांचा ताबा न देणे, शारीरिक व मानसिक त्रास, व्यसनाधीनतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, शैक्षणिक व महत्त्वाची कागदपत्रे हिसकावून घेणे तसेच घरातून हाकलून देणे अशा विविध समस्यांवर समुपदेशनाच्या माध्यमातून मदत केली जाते. यासोबतच प्रत्यक्ष मदत, संदर्भ सेवा आणि कायदेशीर सल्लाही उपलब्ध करून दिला जातो.
केंद्रामार्फत महिलांना समुपदेशन सेवा, कायदेशीर मार्गदर्शन, निवारा गृहाची सुविधा, वैद्यकीय सेवा, विविध शासकीय योजनांची माहिती तसेच मोफत सरकारी वकील मिळवून देण्यासाठी मदत केली जाते. गरजू महिलांच्या पुनर्वसनासाठीही प्रयत्न केले जातात.
महिलांना विविध कायद्यांची माहिती व्हावी आणि सामाजिक जागरूकता वाढावी यासाठी ग्रामीण व शहरी भागात जनजागृती मोहीम राबवून कौटुंबिक हिंसाचार, महिला हक्क आणि समुपदेशन केंद्राच्या कार्याची माहिती देणाऱ्या हस्तपत्रकांचे वाटप करण्यात येते. तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये विवाहपूर्व समुपदेशन, महिला सहाय्य कक्षाची माहिती आणि हेल्पलाइन क्रमांकाबाबत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली जाते.

मागील वर्षभरात महिला समुपदेशन केंद्राकडे 151 महिलांनी तक्रारी नोंदवल्या होत्या. त्यापैकी 30 महिलांना कायदेशीर मदतीसाठी न्यायालयात पाठविण्यात आले, तर 91 कुटुंबांमधील गैरसमज दूर करून समुपदेशनाद्वारे पुन्हा एकत्र आणण्यात यश मिळाले.
महिला समुपदेशन केंद्राच्या यशस्वी कार्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ऋषिकेश काळे व सहकारी, पोलीस प्रशासन, आधार संस्था अध्यक्षा डॉ. भारती पाटील, सचिव प्रा. विजयकुमार वाघमारे यांचे सहकार्य लाभत आहे. केंद्रात समुपदेशक म्हणून श्रीमती रेणू प्रसाद आणि श्रीमती ज्ञानेश्वरी पाटील कार्यरत आहेत.
परिसरातील कोणत्याही महिलेला अडचण असल्यास महिला समुपदेशन केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून केंद्राचा संपर्क क्रमांक 7972339566 असा आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 152300
22 Ct सोने 91.60% : ₹. 144300
18 Ct सोने 75.00% : ₹. 119300
शुद्ध चांदी 999%:₹. 2680/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
