मजूर टंचाईमुळे शेतकऱ्यांची कसरत; चिमनपुरी-पिंपळे खु परिसरात कुटुंबासह लहान मुलांना घेऊन खरीप तयारीला वेग..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी आणि पिंपळे खु परिसरात सध्या खरीप हंगामाच्या तयारीला मोठा वेग आला आहे. अवघ्या काही दिवसांवर खरीप हंगाम येऊन ठेपल्याने शेतकरी कुटुंबे शेतीच्या कामात पूर्ण ताकदीने जुटली आहेत.

मात्र यंदा मजुरांची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना कुटुंबातील सदस्यांसह लहान मुलांनाही शेतात घेऊन काम करावे लागत आहे.
कडक उन्हाच्या तडाख्यात ठिबक सिंचनाच्या नळ्या पसरवणे, जॉइंट व लाइन बसवणे अशी कामे सुरू असून शाळांना सुट्टी असल्याने अनेक शेतकरी आपल्या मुलांच्या मदतीने ही कामे पूर्ण करत आहेत. उन्हाचा प्रचंड त्रास सहन करत शेतकरी कुटुंबे दिवसभर शेतात राबताना दिसत आहेत.

याशिवाय गुरांसाठी चारा भरणे, शेतात शेणखत पसरवणे, पेरणीपूर्व जमिनीची मशागत व तयारी करणे अशा विविध कामांनाही वेग आला आहे. अनेक शेतकरी मजूर उपलब्ध नसल्याने स्वतःच्या कुटुंबाच्या मदतीवरच अवलंबून आहेत.
शेतकऱ्यांनी सांगितले की,
“खरीप हंगाम अगदी डोळ्यापुढे आला आहे. मजूर मिळत नाहीत आणि काम थांबवून चालणार नाही. त्यामुळे मुलांनाही सोबत घेऊन शेतातील कामे उरकावी लागत आहेत.”
उष्णतेचा वाढता तडाखा, मजुरांची कमतरता आणि वेळेची धावपळ अशा तिहेरी संकटाचा सामना करत असतानाही शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत कोणतीही कसूर ठेवताना दिसत नाहीत.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 153800
22 Ct सोने 91.60% : ₹. 144300
18 Ct सोने 75.00% : ₹. 120700
शुद्ध चांदी 999%:₹. 2640/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
