मुलीच्या लग्नाआधीच काळाचा घाला; विजेचा धक्का लागून गवंड्याचा दुर्दैवी मृत्यू..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : तालुक्यातील खवशी येथे बांधकामावर काम करत असताना विजेचा धक्का लागून गवंडी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मुलीचे लग्न काही दिवसांवर आले असतानाच कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मृत व्यक्तीचे नाव बलिराम फुलसिंग बारेला (वय 38, मूळ रा. अछाली, ता. सेंधवा, जि. बडवाणी, मध्यप्रदेश, सध्या रा. अंमळगाव, ता. अमळनेर) असे आहे. बलिराम बारेला हे गवंडी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या मुलीचे लग्न 24 मे रोजी मूळ गावी होणार असल्याने पत्नी छायाबाई व मुले काही दिवसांपूर्वीच गावी गेले होते. त्यामुळे ते अंमळगाव येथे एकटे राहत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, बलिराम बारेला हे खवशी येथील प्रदीप पांडुरंग पाटील यांच्या घराच्या बांधकामावर गवंडी म्हणून काम करत होते. सोमवारी सकाळी सुमारे 9.30 वाजेच्या सुमारास ते घराच्या छतावरील भिंतीला पाणी मारत असताना छतावरून गेलेल्या वीजवाहिन्यांचा अचानक स्पर्श झाला. यात त्यांना जोरदार विजेचा धक्का बसून ते खाली कोसळले.
घटनेवेळी सोबत काम करणारे छोटू बेलदार पिंजारी यांनी तातडीने नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी बलिराम यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालय, अमळनेर येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. मुलीच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच घरातील कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ठेवला. पुढील तपास पोहेकॉ/3162 विजय भोई करीत असून अमळनेर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, बांधकामस्थळी सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. उघड्या वीजवाहिन्यांजवळ काम करताना आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती का, याबाबत परिसरात चर्चा सुरू आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 159500
22 Ct सोने 91.60% : ₹. 147500
18 Ct सोने 75.00% : ₹. 122800
शुद्ध चांदी 999%:₹. 2860/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

