उर्वरित विहीर अनुदानासाठी ७ हजारांची लाच घेताना तांत्रिक सहाय्यक रंगेहात जाळ्यात..

0
New-Doc-05-13-2026-06.22.jpg

24 प्राईम न्यूज 13 May 2026
धुळे : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीच्या उर्वरित अनुदानाची रक्कम मंजूर करून देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचायत समिती धुळे येथील तांत्रिक सहाय्यक विश्वजित संजय भामरे (वय ३१) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवार, दि. १२ मे रोजी करण्यात आली.


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या भावाच्या व वहिनीच्या नावे मौजे नंदाळे बु. येथे शेतजमीन असून त्या शेतात महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून सन २०२३-२४ मध्ये विहीर खोदकामासाठी ३ लाख ९९ हजार ६१० रुपये मंजूर झाले होते. त्यापैकी २ लाख ३९ हजार रुपये लाभार्थींना मिळाले होते. विहिरीचे काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित अनुदानासाठी तक्रारदार पंचायत समिती कार्यालयात पाठपुरावा करीत होते.
दि. ५ मे रोजी तक्रारदार यांनी पंचायत समिती, धुळे येथे तांत्रिक सहाय्यक विश्वजित भामरे यांची भेट घेतली असता, विहिरीची मोजमाप पुस्तिका तपासणी करून पुढे पाठविण्यासाठी शाखा अभियंता व उपअभियंत्यांच्या नावाखाली ७ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती.


तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केली असता आरोपीने स्वतःसह वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी ७ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. कारवाईदरम्यान विश्वजित भामरे यांनी तक्रारदारांकडून ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ व ७-अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 152000

22 Ct सोने 91.60% : ₹. 140600

18 Ct सोने 75.00% : ₹. 117000

शुद्ध चांदी 999%:₹. 2660/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed