११२ वर खोटे कॉल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार; पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचा इशारा.एकाच दिवसात ४५ कॉल; निरर्थक तक्रारींमुळे पोलिसांची तारांबळ.

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : तालुक्यात आपत्कालीन ११२ डायल सेवेला खोटे व विनाकारण कॉल करण्याचे प्रकार वाढत असून यामुळे पोलिसांचा वेळ, मनुष्यबळ आणि वाहनांचे इंधन मोठ्या प्रमाणावर वाया जात आहे. यापुढे ११२ वर खोटे अथवा निरर्थक कॉल करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिला आहे.

११२ डायल सेवा ही नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुरू करण्यात आली असून, कॉल आल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचून तक्रारींचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र काही टवाळखोर, दारूच्या नशेत असलेले तसेच विनाकारण त्रास देणारे व्यक्ती सतत खोटे कॉल करून यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचे समोर आले आहे.

पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ६ मे रोजी ८ कॉल, ७ मे रोजी ११ कॉल, ८ मे रोजी तब्बल ४५ कॉल तर ९ मे रोजी २३ कॉल प्राप्त झाले. यातील अनेक कॉल हे निरर्थक व खोटे असल्याचे निष्पन्न झाले. एका व्यक्तीने तर एसटी बसमध्ये जागा मिळत नसल्याने “मला बसमध्ये जागा मिळवून द्या” अशी मागणी करत ११२ वर कॉल केल्याची माहितीही समोर आली आहे.
पोलीस निरीक्षक निकम म्हणाले की, “११२ वरील प्रत्येक कॉल गांभीर्याने घेतला जातो. वरिष्ठांच्या आदेशानुसार प्रत्येक तक्रारीवर तातडीने कार्यवाही करावी लागते. त्यामुळे कर्मचारी हातातील इतर कामे सोडून घटनास्थळी धाव घेतात. खोट्या कॉलमुळे खरी मदत आवश्यक असलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात.”
त्यामुळे नागरिकांनी ११२ या आपत्कालीन सेवेचा गैरवापर टाळावा, अन्यथा संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 151000
22 Ct सोने 91.60% : ₹. 139700
18 Ct सोने 75.00% : ₹. 116300
शुद्ध चांदी 999%:₹. 2580/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
