शेतरस्त्याच्या वादातून दोघांनी ६० ते ७० पोते बाजरी जाळली..

आबिद शेख/अमळनेर
शेतरस्त्याच्या वादातून दोघांनी एकाच्या शेतातील ६० ते ७० पोते बाजरी जाळून टाकल्याची घटना दि.५ मे २०२६ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास जवखेडा येथे घडली.आधार देवचंद पाटील (वय ६५, रा. जवखेडा) यांचे गट नंबर ६८२/२ मध्ये एक हेक्टर १४ आर. शेती असून त्यात बाजरी लावली होती. त्यांचे
आणि गावातीलच सुभाष नथू पाटील आणि गुलाब मधुकर पाटील (रा. जवखेडा) यांच्यात शेतात जाणाऱ्या रस्त्यावरुन एक वर्षांपासून वाद सुरु होते. दि.५ रोजी त्याचा निकाल आधार पाटील यांच्याकडून लागला होता. शेतात काढून ठेवलेली ६० ते ७० पोते बाजरी ते सांभाळत होते. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ते शेतातून जेवण्यासाठी घरी आले. गावात कार्यक्रम असल्याने पाहुणे आलेले होते म्हणून त्यांना

शेतात परतायला उशीर झाला. रात्री अकरा वाजता ते जेव्हा शेतात गेले तेव्हा त्यांना त्यांची शेतातील झोपडी व बाजरीची गंजी जळताना दिसली आणि गावातील दोघे सुभाष आणि गुलाब पळून जाताना दिसले. तेव्हा आधार पाटील पळत जाऊन मुलाला व इतरांना बोलावले. मुलगा संदीप पाटील, दादाभाऊ पाटील, विकेश माळी, मनोज पाटील, सचिन पाटील, सुरेश पाटील यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.

आग विझत नव्हती म्हणून गावातील जेसीबी मशीन बोलावून गंजी मोकळी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही ६० ते ७० पोते बाजरी जळून खाक झाली. आधार पाटील यांनी घटना गावचे पोलीस पाटील प्रकाश कुऱ्हाडे याना सांगून अमळनेर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध तक्रार दिल्यावरुन भारतीय न्यायसंहिता कलम ३२६ (फ) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास बेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील करीत आहे.
