देशात चार नवीन कामगार कायदे अखेर लागू; केंद्राची नियमावली प्रसिद्धकामगारांना किमान वेतन, सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य सुविधांचा लाभ..

0
New-Doc-05-11-2026-10.15.jpg

24 प्राईम न्यूज 11 May 2026
नवी दिल्ली : केंद्र सरकारने तब्बल पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चार नवीन कामगार कायद्यांसंदर्भातील अंतिम नियमावली अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध केली असून, त्यामुळे देशभरात या कायद्यांच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

कामगारांच्या वेतन, सुरक्षा, आरोग्य आणि रोजगाराशी संबंधित अनेक महत्त्वाच्या तरतुदी आता प्रभावीपणे लागू होणार आहेत.
केंद्र सरकारने वेतन संहिता २०१९, औद्योगिक संबंध संहिता २०२०, सामाजिक सुरक्षा संहिता २०२० आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाच्या परिस्थितीबाबतची संहिता २०२० हे चार कामगार कायदे यापूर्वी लागू केले होते.

मात्र, नियमावली जाहीर न झाल्याने अंमलबजावणीत अडचणी येत होत्या. आता अंतिम नियमावली अधिसूचित झाल्याने या कायद्यांची अंमलबजावणी अधिक स्पष्ट आणि प्रभावी होणार आहे.
केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या २९ कामगार कायद्यांचे सुलभीकरण आणि आधुनिकीकरण करण्यासाठी हे चार नवीन कायदे आणण्यात आले आहेत. उद्योग क्षेत्राला सुलभता देतानाच कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यावर भर देण्यात आला आहे.
नवीन कामगार कायद्यांतील महत्त्वाच्या तरतुदी
आठवड्याला जास्तीत जास्त ४८ तास कामाची मर्यादा
आठवड्यातून किमान एक दिवस अनिवार्य सुटी
निश्चित वेळेपेक्षा जास्त कामासाठी ओव्हरटाइम वेतन
४० वर्षांवरील कामगारांची मोफत आरोग्य तपासणी
महिलांना समान कामासाठी समान वेतन व समान संधी
नोकरी गमावलेल्या कामगारांसाठी राष्ट्रीय पुनर्कौशल्य निधी
सर्व कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा आणि वेतन संरक्षण
३० डिसेंबर २०२५ रोजी या नियमावलीचा मसुदा हरकती व सूचनांसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर कायदेशीर पडताळणी पूर्ण करून अंतिम नियम अधिसूचित करण्यात आले आहेत.
कामगार हा विषय समवर्ती सूचीत येत असल्याने केंद्रासह राज्य सरकारांनाही स्वतंत्र नियम अधिसूचित करावे लागणार आहेत. या नवीन कायद्यांमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळण्यासह कामगारांच्या हक्कांचे अधिक सक्षम संरक्षण होईल, असा दावा केंद्र सरकारने केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed