देशातील पहिले ‘व्हीआर’ आणि ‘एआय’ आधारित श्री मंगळग्रह मंदिर; डिजिटल दिव्यदर्शनाची सुविधा सुरू.आमदार अनिलदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; तंत्रज्ञानाधारित धार्मिक पर्यटनाला नवी दिशा.

0
New-Doc-05-10-2026-06.49.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिराने धार्मिक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अभिनव वापर करत देशात नवा आदर्श निर्माण केला आहे. मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे मंदिराच्या संपूर्ण आभासी दिव्यदर्शनाची अनुभूती देणारी अत्याधुनिक व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) यंत्रणा सुरू करण्यात आली असून, या उपक्रमाचे उद्घाटन आमदार अनिलदादा पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आले. विशेष म्हणजे, देशात प्रथमच अशा प्रकारची व्हीआर यंत्रणा श्री मंगळग्रह मंदिरात कार्यान्वित झाली आहे.


यापूर्वी मार्च महिन्यात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते मंदिरात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित यंत्रणेचे उद्घाटन झाले होते. त्यामुळे श्री मंगळग्रह मंदिर हे देशातील पहिले ‘एआय मंदिर’ म्हणूनही ओळखले जात आहे. आता या नव्या व्हीआर प्रकल्पामुळे जगभरातील भाविक आणि पर्यटकांना मंदिराचा डिजिटल अनुभव घरबसल्या घेता येणार आहे.
या उद्घाटन प्रसंगी डांगरीचे माजी सरपंच अनिल शिसोदे, कामगार नेते एल. टी. नाना पाटील, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, सेवेकरी विनोद कदम, प्रकाश मेखा, सौ. आशाताई महाले, ‘ग्लोबल महातेज’चे कार्यकारी संपादक भरत पाटील, ब्युरो चीफ रजनीकांत पाटील, आर्टिस्ट समीर सांगळे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.


या अत्याधुनिक यंत्रणेमुळे भाविकांना मंदिर परिसराचा संपूर्ण आभासी फेरफटका मारता येणार आहे. मंदिरातील विविध देवतांची स्थाने, गाभारा, पूजाविधींची ठिकाणे आणि संपूर्ण परिसर 360 अंशांमध्ये पाहण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोणतेही ॲप डाउनलोड न करता मोबाईल किंवा संगणकावर ही सुविधा सहज वापरता येणार आहे. मंदिर परिसरात परस्परसंवादी स्पर्शपटल केंद्रही उभारण्यात आले आहे.
या डिजिटल भ्रमंतीमध्ये मार्गदर्शित तसेच स्वयंसंचलित असे दोन्ही पर्याय उपलब्ध असून मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये ध्वनी मार्गदर्शनाची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे वृद्ध, दिव्यांग तसेच परदेशात राहणाऱ्या भारतीय भाविकांनाही मंदिराचा अनुभव सहज घेता येणार आहे.
दरम्यान, या तंत्रज्ञानामुळे मंदिरात येणाऱ्या भाविक व वाहनांच्या व्यवस्थापनालाही मदत होणार असल्याचे सांगण्यात आले. तंत्रज्ञानाधारित धार्मिक पर्यटनाच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
हा प्रकल्प मुंबई, कोची आणि दिल्ली येथे कार्यालये असलेल्या ‘इम्पॅक्ट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने विकसित केला आहे. डिजिटल ट्विन तंत्रज्ञान, जीआयएस नकाशांकन, कृत्रिम बुद्धिमत्ता विश्लेषण आणि अनुभवात्मक पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपनीने ड्रोन फोटोग्रॅमेट्री, 360 अंशीय स्कॅनर आणि प्रगत त्रिमितीय रेंडरिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मंदिराची सविस्तर डिजिटल प्रतिकृती तयार केली आहे. या प्रकल्पासाठी चेन्नईचे मिथुन आनंद, मुंबईच्या दीप्तीताई पाटील, वंश चिंदा आणि पुष्कर पुष्प यांनी विशेष योगदान दिले.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 151300

22 Ct सोने 91.60% : ₹. 140000

18 Ct सोने 75.00% : ₹. 116500

शुद्ध चांदी 999%:₹. 2580/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed