जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता ५ लाखांच्या लाचेसह रंगेहाथ अटकेत..

24 प्राईम न्यूज 10 May 2026
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव विभागाने मोठी सापळा कारवाई करत सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता योगेश अभिमन्यु अहिरे (वय ४४) यांना ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवार दि. ९ मे २०२६ रोजी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सब-कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी जळगाव शहरातील विनोबा नगर परिसरात सिमेंट काँक्रीट रस्त्याचे सुमारे ८० लाख ३९ हजार रुपयांचे काम पूर्ण केले होते. या कामाचे काही बिल मंजूर झाले असले तरी उर्वरित ३८ लाख ४९ हजार ७४२ रुपये अद्याप प्रलंबित होते.

हे बिल मंजूर करून देण्यासाठी शाखा अभियंता योगेश अहिरे यांनी सुरुवातीला १८ लाख रुपयांची लाच मागितली होती. नंतर तडजोडीअंती ही रक्कम १५ लाखांवर ठरवण्यात आली. त्यापैकी ५ लाख रुपये पहिला हप्ता म्हणून तात्काळ देण्याचे ठरले होते. तसेच उर्वरित रक्कम काम पूर्ण झाल्यानंतर स्वीकारण्याचे मान्य करण्यात आले होते.
तक्रारदारांनी याबाबत दि. ५ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. पंचासमक्ष पडताळणीत लाच मागणी स्पष्ट झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. कारवाईदरम्यान योगेश अहिरे यांनी तक्रारदारांना त्यांच्या निळ्या रंगाच्या बलेनो कार (एमएच १९ सीव्ही २६१९) मधील समोरील सीटखाली ५ लाख रुपये ठेवण्यास सांगितले. त्यावेळी एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.
तसेच, एकूण बिलाच्या ६ टक्के रक्कम नगरसेविकेच्या मुलाला देण्यास सांगून लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचेही तपासात समोर आले असून, त्याबाबत पुढील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे तसेच एसीबीच्या पथकाने केली.
दरम्यान, भ्रष्टाचारासंबंधी माहिती अथवा लाच मागणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 151300
22 Ct सोने 91.60% : ₹. 140000
18 Ct सोने 75.00% : ₹. 116500
शुद्ध चांदी 999%:₹. 2580/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
