छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान” अंतर्गत शुक्रवारी (दि. ८ मे) अमळनेर नगरपरिषद येथे विशेष समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला.

तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय, अमळनेर यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिरात अमळनेर मंडळातील अमळनेर, मंगरुळ, धार, मालपूर, रंजाणे आणि अंलोन या गावांतील नागरिक सहभागी झाले होते. शासनाच्या विविध विभागांनी स्वतंत्र स्टॉल उभारून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि महिलांच्या तक्रारी व समस्या तत्काळ सोडविण्याचा प्रयत्न केला.

शिबिरास तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, निवासी नायब तहसीलदार एस. यू. पाटील, पुरवठा निरीक्षक अधिकारी आर. जे. शेख, महिला व बालकल्याण अधिकारी पेमन्नना पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पुरवठा शाखेमार्फत ८ नवीन शिधापत्रिका व दुबार शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले. संजय गांधी योजना शाखेत राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले तसेच ६५ डीबीटी प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. याशिवाय वृद्धापकाळ व श्रावणबाळ योजनांसाठी हयात प्रमाणपत्रांचे वितरणही करण्यात आले.
तहसील कार्यालयामार्फत ४१ फेरफार प्रकरणांचे निकाल काढण्यात आले तसेच ३७७ सातबारा उताऱ्यांचे वितरण करण्यात आले. सेतू शाखेतून ९० उत्पन्न दाखले, ६५ राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रे, ५६ रहिवासी दाखले आणि ५० जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच १२१ आधार नोंदणी व ५९ आधार दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली.
महिला व बालविकास विभागाकडून ३० लाभार्थ्यांना बेबी किटचे वाटप करण्यात आले. याशिवाय विद्यारंभ प्रमाणपत्रे, प्रधानमंत्री मातृत्व योजना, लेक लाडकी योजना तसेच पोषण आहार योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला.
कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना कृषी अवजारांचे वाटप करण्यात आले, तर महावितरण विभागाने नवीन वीज जोडणीसाठी आदेश वितरित केले.
या समाधान शिबिरात अंदाजे ६०० ते ६५० नागरिकांनी उपस्थिती नोंदवून शासनाच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या शेवटी संजय गांधी योजना नायब तहसीलदार राजेंद्र ढोले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 151500
22 Ct सोने 91.60% : ₹. 140100
18 Ct सोने 75.00% : ₹. 116600
शुद्ध चांदी 999%:₹. 2580/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
