संतविचार पीठातर्फे १० मे रोजी पंढरपूर येथे “समता वारी २०२६” चे आयोजन..

0
New-Doc-05-08-2026-10.24.jpg

आबिद शेख/अमळनेर
पंढरपूर : संतविचार पीठातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही “समता वारी २०२६” चे आयोजन रविवार, दि. १० मे २०२६ रोजी श्रीसंत कैकाडीबाबा विश्वपुण्यधाम मठ, पंढरपूर येथे करण्यात आले आहे. सामाजिक समता, बंधुता आणि माणुसकीचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमासाठी भाविक व वारकरी बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


साने गुरुजींनी १ मे ते १० मे १९४७ या कालावधीत पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी आमरण उपोषण करून सामाजिक समतेचा लढा उभारला होता. त्या सत्याग्रहाच्या स्मृतिप्रीत्यर्थ “समता वारी” आयोजित केली जाते.
यावेळी श्री. कैकाडी महाराज यांचे माणुसकी व समतेचा संदेश देणारे विचार विशेषत्वाने मांडण्यात येणार आहेत. “ज्या हृदय मंदिरात परमेश्वराचे वास्तव्य असते, ती हृदय मंदिरे एकमेकांसाठी खुली करा आणि प्रेमाचे स्थान द्या,” असा मानवतेचा संदेश त्यांनी दिला होता.


कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ४ वाजता श्रीसंत चोखोबाराय समाधी अभिवादन व मंदिर प्रदक्षिणेने होईल. त्यानंतर ४.१५ ते ५ या वेळेत “वारकरी संप्रदाय आणि सामाजिक समता” या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
सायंकाळी ५ ते ६ या वेळेत ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर लिखित “अभंगबोध” या पुस्तकाचे प्रकाशन, पुस्तकावरील भाष्य तसेच लेखकाची मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमाचा समारोप सायंकाळी ६ वाजता महाप्रसादाने होणार आहे.
या कार्यक्रमास वारकरी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संतविचार पीठ, पंढरपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed