अमळनेरमध्ये पाणीटंचाईवरून राजकारण तापले; सत्ताधाऱ्यांवर माजी मंत्री अनिल पाटील यांचा गंभीर आरोप.

आबिद शेख/अमळनेर
अनिल पाटील यांनी अमळनेर नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत शहरातील पाणीटंचाईबाबत प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. जनतेच्या जीवावर सत्ता मिळवून दोन दिवसाआड पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात गेल्या दीड महिन्यांपासून शहरभर पाण्याची भीषण समस्या निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अनिल पाटील म्हणाले की, अमळनेरकर नियमितपणे पाणीपट्टी कर भरत असताना देखील नागरिकांना दहा-दहा दिवस पाणी मिळत नाही. उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे नागरिक हैराण झाले असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असून टाक्या पुरेशा भरल्या जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी त्यांनी काही नगरसेवकांवर आपल्या भागात जास्त पाणी सोडण्यासाठी पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांवर दबाव आणत असल्याचाही गंभीर आरोप केला. “जळोद डोहातील पाणी आटत असल्याने गंगापुरी डोहातून पाणी आणण्यासाठी खर्च केला जात आहे, मग आवर्तन घेण्यास टाळाटाळ का केली जाते? जनतेला पाणी मिळणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी ४० लाख रुपये खर्च झाले तरी चालतील,” असेही ते म्हणाले.आंदोलनाचा इशारा
शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने निर्णय न घेतल्यास शहर विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही अनिल पाटील यांनी दिला.
“200 कोटींची योजना थंडबस्त्यात”
अमळनेर शहराच्या पुढील ५० ते ६० वर्षांच्या पाण्याच्या गरजा लक्षात घेऊन धरणावरून २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेसाठी २०० कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शहरात पाइपलाइन टाकण्याचे कामही सुरू झाले होते. मात्र सत्तांतरानंतर या योजनेलाही ब्रेक लागल्याचा आरोप करत “मी स्वतः या कामात लक्ष घालणार असून लवकरच या योजनेला गती देणार,” असे अनिल पाटील यांनी स्पष्ट केले.
बोरी पात्र यात्रेच्या नियोजनावरही टीका
बोरी पात्रातील पारंपरिक यात्रोत्सवात प्रथमच ठेकेदारी व वसुलीचा प्रयोग करण्यात आल्याने बाहेरगावाहून आलेले विक्रेते आणि पाळणेवाले नाराज झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे यात्रेचे संपूर्ण नियोजन कोलमडल्याचा आरोप करत “स्वार्थापोटी येथेही प्रशासन फेल ठरले,” अशी टीका त्यांनी केली.
“नगराध्यक्षांना बाहुले बनवले”
नगराध्यक्ष व नगरसेवकांना जनतेने मोठ्या अपेक्षेने निवडून दिले असले तरी त्यांना “खेळण्यातले बाहुले” बनवून ठेवण्यात आले असल्याचा आरोपही त्यांनी केला. “नगरपालिकेची चावी दुसऱ्याच्याच हातात असून लोकशाहीचा हा सत्यानाश आहे,” असा टोला लगावत नगराध्यक्षांनी कुणाचेही बाहुले बनू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 152000
22 Ct सोने 91.60% : ₹. 140600
18 Ct सोने 75.00% : ₹. 117000
शुद्ध चांदी 999%:₹. 2580/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
