अमळनेरच्या सुपुत्राची गुजरातमध्ये पुन्हा दमदार एन्ट्री; संजय पाटील तिसऱ्यांदा नगरसेवक..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : अमळनेर येथील सानेनगरमधील रहिवासी तसेच शहरातील पैलाड भागातील जावई संजय केशव पाटील यांनी गुजरात राज्यातील सुरत शहरातील लिंबायत भागातून तिसऱ्यांदा नगरसेवकपदावर विजय मिळवून खान्देशाचा ठसा पुन्हा एकदा उमटवला आहे. त्यांच्या या यशामुळे अमळनेर शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संजय पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात १९९४ मध्ये लिंबायत येथे भाजप युवा प्रमुख म्हणून केली. त्यानंतर १९९७ मध्ये सुरत शहर युवा मोर्चाचे सचिव, २००० मध्ये उपाध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. २००५ ते २०१० या कालावधीत त्यांनी नगरसेवक म्हणून कार्य करताना आरोग्य सभापती, स्थायी समिती सदस्य तसेच नगरनियोजन समितीचे व्हाईस चेअरमन अशी महत्त्वाची पदे भूषवली.

२०१७ मध्ये उमरगाव विधानसभा क्षेत्राचे पूर्णकालीन विस्तारक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. २०२१ ते २०२६ या कालावधीत शिक्षण समिती सदस्य, स्पोर्ट्स कमिटी आणि पर्यटन उद्योग चेअरमन म्हणून त्यांनी कार्य केले. त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे २८ एप्रिल २०२६ रोजी पुन्हा एकदा त्यांची नगरसेवकपदी निवड झाली.
संजय पाटील हे अमळनेरच्या सानेनगरमधील रहिवासी असून पैलाड येथील पंढरीनाथ तानचंद देवरे यांचे जावई आहेत. त्यामुळे अमळनेरच्या दोन्ही भागात त्यांच्या विजयाचा उत्सव साजरा होत आहे. खान्देशातील व्यक्तीने गुजरातमध्ये सत्तेच्या राजकारणात आपली छाप पाडणे ही अमळनेरकरांसाठी अभिमानाची बाब ठरत असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 148500
22 Ct सोने 91.60% : ₹. 137000
18 Ct सोने 75.00% : ₹. 114000
शुद्ध चांदी 999%:₹. 2450/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
