शिवसेनेच्या वरिष्ठांच्या नाराजीने राहुल कंजर यांचा युवासेना तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा!

0

अमळनेर/ आबिद शेख 

अमळनेर : छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार नामकरणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झाल्याने पक्षातील वरिष्ठ नाराज झाल्याचा आरोप; स्वाभिमान जपत राहुल कंजर यांचा पद सोडण्याचा निर्णय

अमळनेर येथील युवासेना (शिवसेना) तालुकाप्रमुख राहुल भास्कर कंजर यांनी १ नोव्हेंबर रोजी आपल्या पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना लेखी राजीनामा सादर केला आहे.

अमळनेर शहरातील प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ असे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या समितीचे सक्रिय सदस्य असल्याने आपण या मोर्चात सहभागी होणे आवश्यक होते, असे राहुल कंजर यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे.

मात्र, संबंधित मोर्चात सहभागी झाल्यामुळे आमदार शिरीषदादा चौधरी नाराज झाले आणि आपल्याकडे पदाचा राजीनामा मागण्यात आल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. मोर्चात सहभागी झालेले बहुतांश शिवप्रेमी हे शिवसेनेचेच कार्यकर्ते होते. आपणही पक्षाच्या विचारधारेवर निष्ठा ठेवून आजपर्यंत काम केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

तालुकाप्रमुख म्हणून काम करताना अपेक्षित अधिकार, निर्णयस्वातंत्र्य आणि काम करण्यासाठी आवश्यक वातावरण मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. वरिष्ठांची नाराजी दूर करण्यासाठी स्वतःच्या विचारांशी आणि स्वाभिमानाशी तडजोड करणे आपल्याला मान्य नसल्याचे सांगत त्यांनी कोणताही वाद किंवा कटुता न ठेवता स्वेच्छेने राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.

हा राजीनामा केवळ पदाचा असून, शिवसेना संघटनेपासून दूर जाण्याचा आपला हेतू नाही. यापुढेही एक शिवसैनिक म्हणून काम करत राहणार असून संघटनेप्रती निष्ठा आणि विचारधारा कायम राहील, अशी भूमिका राहुल कंजर यांनी मांडली आहे.

राजीनामा पत्रामुळे अमळनेरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed