चिमनपुरी पिंपळे खु. येथे डिझेल तुटवडा तीव्र; शेतकऱ्यांची धावपळ वाढली, शेतीकामे ठप्प..

0
New-Doc-05-05-2026-06.13.jpg


अमळनेर /आबिद शेख
अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे खु. परिसरात डिझेलच्या तीव्र तुटवड्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होत असून, सध्या सुरू असलेली शेतीकामे अक्षरशः ठप्प झाली आहेत.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मशागत, नांगरणी आणि पेरणीपूर्व तयारीची कामे जोरात सुरू असतानाच अचानक निर्माण झालेल्या या समस्येमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
सकाळपासून अनेक शेतकरी डिझेल मिळवण्यासाठी चार–चार तास रांगेत उभे राहत आहेत. मात्र, स्थानिक पेट्रोल पंपांवरून डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे. परिणामी, शेतकऱ्यांना हाती घेतलेली कामे अर्धवट सोडून परतावे लागत आहे.


डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना 12 ते 15 किलोमीटर अंतर पार करून अमळनेर शहरात जावे लागत आहे. परंतु, तेथेही पुरवठा मर्यादित असल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाढत असून आर्थिक ताण तीव्र झाला आहे.
शेतकऱ्यांचा संताप व्यक्त
स्थानिक शेतकरी युवराज पाटील यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की,
“सकाळपासून रांगेत उभे राहूनही डिझेल मिळत नाही. ट्रॅक्टर, पंपसेट सर्व काही डिझेलवर चालते. पेरणीचे दिवस जवळ आलेत, पण प्रशासन झोपलेले आहे. आम्ही शेती करायची तरी कशी?”
प्रशासनाकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून डिझेल पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा खरीप हंगामात पेरणी उशिरा होऊन उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक पातळीवर ही समस्या दिवसेंदिवस तीव्र होत असून, प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 148500

22 Ct सोने 91.60% : ₹. 137400

18 Ct सोने 75.00% : ₹. 114300

शुद्ध चांदी 999%:₹. 2470/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed