जानवे प्राथमिक आरोग्य केंद्रात अॅम्बुलन्सला चालकच नाही; ऑटो रिक्षात मातेला प्रसूती, प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड.
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : तालुक्यातील जानवे येथे आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, ॲम्बुलन्स वेळेवर उपलब्ध न झाल्याने एका गर्भवती महिलेला रिक्षातच बाळाला जन्म द्यावा लागल्याची घटना रविवारी (दि. ३ मे) रात्री घडली. सुदैवाने माता व नवजात बाळ दोघेही सुरक्षित असून, या प्रकारामुळे नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मायाबाई शांताराम भिल (वय २६, रा. पिंपळे) यांना रविवारी रात्री सुमारे १० ते १०.३० वाजेच्या दरम्यान प्रसूतीवेदना सुरू झाल्या. तातडीने त्यांना रुग्णालयात हलविण्यासाठी गावातील युवराज पाटील व अशा सेविका साधना पाटील इतर लोकांनी जानवे प्राथमिक आरोग्य केंद्राशी १०२ वर संपर्क साधला. मात्र, तेथून “ॲम्बुलन्स उपलब्ध नाही”, “ड्रायव्हर नाही” अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली, असा आरोप करण्यात येत आहे.

दरम्यान, परिस्थिती गंभीर होत असल्याने संबंधितांनी खाजगी ऑटो रिक्षाची व्यवस्था करून मायाबाई यांना अमळनेरकडे रवाना केले. मात्र, पिंपळे येथून ढेकू मार्गे अमळनेर येत असतांना वाटेतच त्यांना तीव्र वेदना सुरू झाल्याने रस्त्यातच रिक्षामध्ये प्रसूती झाली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बाळाचा जन्म झाला असून, स्थानिकांच्या मदतीने पुढील वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करत त्यांना अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळ व बाळाचीआई सुखरूप आहेत.
ही पिंपळे गावातील अशा प्रकारची तिसरी घटना असल्याचे समोर येत असून, वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “आरोग्य सेवा वेळेवर मिळत नसल्याने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या घटनेनंतर संबंधित आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
