अमळनेरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; संत सखाराम महाराज पालखीचे मुस्लिम बांधवांकडून स्वागत..

0
New-Doc-05-04-2026-11.03.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : शहरातील सराफ बाजार परिसरात सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचे प्रेरणादायी दर्शन घडवणारा आगळावेगळा उपक्रम पाहायला मिळाला. इलाही मस्जिदीजवळ बाराभाई ऊर्फ अंदरपुरा मोहल्ला ट्रस्टच्या वतीने श्री संत सखाराम महाराजांच्या पालखीचे उत्साहात व भक्तिभावाने स्वागत करण्यात आले.


यावेळी ह.भ.प. प्रसाद महाराज यांचा ट्रस्टचे अध्यक्ष अफसर पठाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नगरसेवक नविद शेख यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असून त्यामुळे समाजात जातीय सलोखा टिकून आहे आणि पुढेही तो कायम राहील.


ह.भ.प. प्रसाद महाराज यांनी आपल्या भाषणातून हिंदू-मुस्लिम ऐक्याची प्रेरणादायी उदाहरणे देत उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या विचारांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच बाराभाई ट्रस्टचे उपाध्यक्ष आरिफ मेमन, अशफाक शेख, अहेतेशाम खान, रियाज ठेकेदार, मुजाहिद शेख आणि मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.
या उपक्रमातून अमळनेर शहरातील सामाजिक एकात्मता, परस्पर सन्मान आणि बंधुभावाचे उत्कृष्ट उदाहरण पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed